Home Study Material चतुरसिंग भोसले

चतुरसिंग भोसले

छत्र. शाहू महाराजांच्या निधनानंतर साताऱ्याच्या गादीचे महत्त्व पेशव्यांची नष्टप्राय करुन टाकले आणि सगळी सत्ता आपल्या ताब्यात घेतली. राज्याचा महसूल पेशव्यांच्या खजिन्यात पुण्याला जमा होऊ लागला. त्यातून छत्रपतींना दरवर्षी ६ लाख रुपये खर्चासाठी दिले जात होते. नंतर नाना फडणीसाने ती रक्कम कमी करुन एक लाखावर आणली. नाना फडणीसाच्या मरणानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तह केला. इंग्रजांच्या तालावर त्याला कारभार करावा लागला. साताऱ्यालाही इंग्रज रेसिडेंट आला. छत्र शाहू नंतर रामराजा गादीवर आला. तो तर पेशव्यांच्या हातातले बाहुलेच होता. त्याला पुत्रसंतान नसल्याने त्याने छत्र. शिवाजी महाराजांचे चुलते विठोजी भोसले याचा वंशज विठोजी याला दत्तक घेऊन त्याचे नाव शाहू (दूसरे) असे ठेवले. या शाहू बरोबर त्याचा धाकटा भाऊ चतुरसिंग हा सुद्धा साताऱ्याला राहू लागला. शाहू शरीराने धडधाकट होता. पण त्याच्या भोवती एका बाजूने पेशव्याचा, तर दुसऱ्या बाजूने इंग्रज रेसिडेंटचा काच होता. त्यामुळे तो काहीच करु शकत नव्हता. त्याचे जिणेच मुळी परावलंबी होते. राजा असला तरी हातात कसलेही अधिकार नव्हते. शाहूच्या या अगतिकतेची चीड चतुरसिंगाला येई. काहीतरी करुन स्वतंत्रपणे राज्यकारभार करावा, असा सल्ला तो शाहूला वरचेवर देत असे पण पेशव्यांकडे खजिना, गडावरील घोडदळ व हत्ती वगैरे पेशव्यांनी काढून घेतलेले. हाती पैसा नाही की सैन्य नाही, तेव्हा शाहू तरी काय करणार? चतुरसिंगाला मात्र वाटायचे की, आपण पेशवा व इंग्रज यांच्याविरुद्ध बंड करावे आणि आपले राज्य स्वतंत्र करावे ही तर फार मोठ्या धाडसाची गोष्ट होती. कारण पेशव्यांनी छत्रपतींच्या राजमहालावर चौक्या-पहारे बसविले होते. मराठा राज्याच्या सरदार-दरकदारांना छत्रपतींची भेट घेण्यासाठी बंदी होती पुण्याहून आदेश आल्याशिवाय छत्रपतींना साध्या साध्या गोष्टीही करता येत नव्हत्या. नाना फडणीशी कारभाराने स्वतःचे व आपल्या परिवाराचे जिणे गुलामीपेक्षाही बेहतर झाल्याचे पाहून शाहूचे मन अस्वस्थ झाले. आपल्या राज्याचे पुढे काय होणार, या विचाराने तो चिंताग्रस्त झाला. ते स्वाभाविकच होते.
दुसऱ्या बाजीरावाच्या अमदानीत पुण्यामध्ये माजलेली अंधाधुंदी व बेबंदशाही हीच इंग्रजांचा गुलाम झालेल्या पेशव्याविरुद्ध व इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याची चांगली संधी आहे, हे चतुरसिंगाने हेरले. त्याने छत्रपतीनिष्ठ तरुणांची संघटना गुप्तपणे बांधली व मराठा सरदारांच्या भेटीगाठी घेण्याचे त्याने सुरु केले. या कामी शाहू महाराजांचा त्याला आशीर्वाद होता. चतुरसिंग धडाडीने कामाला लागल्याचे पाहून शाहूछत्रपतींनाही धीर आला. चतुरसिंग जात्याच हुशार, चाणाक्ष, धाडसी कल्पक व अत्यंत स्वाभिमानी असल्याने थोड्याच काळात अनेक मराठा तरुण, कायस्थ प्रभू, देशस्थ ब्राम्हण आणि अन्य जातीचे तरुण वीर चतुरसिंगाभोवती जमा झाले. छोट्या-मोठ्या वतनदारांचा व जहागीरदारांचा पाठिंबा मिळवून हजार-बाराशे सैन्य जमवून चतुरसिंग हिंडतो आहे, ही बातमी सर्जेराव घाटग्याने दुसऱ्या बाजीरावाला दिली, तेव्हा तो हडबडूनच गेला. बाजीराव आधीच इंग्रजांच्या पंजात सापडलेला होता. त्यातच हे नवे संकट उभे राहिले. बाजीरावाने सर्जेरावामार्फत चतुरसिंगाला चुचकारुन पाहिले.तेव्हा चतुरसिंगाने त्याला बाणेदारपणे उत्तर दिले, “धनी आम्ही! तो पेशवा भट आमचा नोकर! तो आम्हांला सरदारी देणार म्हणे. धन्याला नागवून भिकारी करणारा हा कोण रे चोर?”असे म्हणून चतुरसिंगाने धाटग्याला उडवूनच लावले. नंतर तो पुण्याला जाऊन दुसऱ्या बाजीरावचे लंपट चाळे फक्त बघून आला सर्जेरावाला चतुरसिंगाने असेही सुनावले की, “हा पाजी पेशवा स्वतः तर बुडतोच आहे, आणि आपल्याबरोबर सगळ्या राज्याची हा वाट लावतो आहे. तशात हे गोरे मूठभर असूनही धडाधड सगळ्या सरदारांना चारी मुंड्या चीत करत आहेत.”सर्जेराव गप्पच झाला.
निराश न होता, नव्या दमाने चतुरसिंग नागपूरच्या भोसल्याकडे गेला. रघुजी भोसले यांनी त्याचे यथायोग्य स्वागत करुन त्याला दोन हजार फौज व दरमहा पंधरा हजार रुपयांची नेमणूक दिली. दौलतराव शिंद्यांच्या निमंत्रणावरुन तो सागर येथे गेला. त्याच्याशी व यशवंतराव होळकराशी मसलत केली. पेंढाऱ्यांचे पुढारी अमीरखान व करीमखान हे सुद्धा त्याला चंबळा नदीच्या काठी येऊन मिळाले. सर्वांनी संघटितपणे इंग्रजांच्या व दुसऱ्या बाजीरावच्या परिपत्यासाठी आणाभाका घेतल्या. सर्जेराव घाटग्याला मात्र त्याने खडसावले. तो खजील होऊन गेला व त्याने चतुरसिंगाची माफी मागितली. सर्वजण नंतर अजमेर येथे गेले. भरतपूरच्या जाट राजाला भेटून त्याला चतुरसिंगाने आपल्या संघटनेत सामील करुन घेतले.
इंग्रज सेनापती लेक व माल्कम यांची चतुरसिंगाने आधी वकील पाठवून गाठ घेतली. दोघांनीही मानभावीपणे चतुरसिंगाचा सत्कार केला. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “पेशवे हे छत्रपतींचे नोकर आहेत. स्वराज्याचे मालक छत्रपती. आम्ही आमच्या छत्रपतीसाठी स्वराज्य मिळविण्याकरिता झगडत आहोत. पेशव्याने आमच्या स्वराज्याविषयी तुम्हाला काहीही लिहून दिले असले, तरी आम्ही मराठे ते बिलकूल जुमानणार नाही. याद राखून ठेवा!”त्या दोघांनी चतुरसिंगाला सरदारी जहागीर देण्याचे मधाचे बोट लावून पाहिले. तेव्हा तो उसळून त्यांना म्हणाला, “आम्ही स्वार्थासाठी वनवास पत्कारलेला नाही. मराठा राज्य तमाम मराठ्यांचे आहे. आमचे धनी छत्रपती. आमच्या राज्याला धक्का लागला, तर आम्ही प्राण खर्ची घालू. आडवे येतील त्यांना कापून काढू. तेव्हा आपला-परका पाहणार नाही. लक्षात ठेवा.”

[irp]

जुलै १८०६ मध्ये पुष्कर येथे चतुरसिंगाची आणि यशवंतराव होळकराची भेट झाली. जोधपूरचा राजा मानसिंग हा सुद्धा तेथेच चतुरसिंगाला भेटला. मनसुभा ठरला जयपूरचा राजा जगतसिंह सुद्धा त्यांना सामील झाला. उदेपूरच्या राजानेही तशी ईच्छा व्यक्त केली. बद्योद्याचा कान्होजीही त्यांना मिळाला. चतुरसिंग उज्जैनला आला. तेथे बातमी आली की, छत्र शाहू महाराजांचे निधन झाले. चतुरसिंग अतिशय निराश झाला. इंग्रजांनी प्रतापसिंहाला गादीवर बसवून ग्रँट डफ हा सातारा राज्याचा कारभार पाहू लागला आहे, असे ही त्याला समजले. आता साताऱ्यास जाण्यात काय अर्थ? तो अत्यंत खिन्न झाला. तेव्हा बापू कान्हो, व्यासराव डबीर व मल्हारराव चिटणीस यांनी सल्ला दिला की, आजवर खूप भटकलो. पण काही उपाय सापडत नाही. तरी स्वदेशी जाऊनच काय साधेल, ते करावे. सन १८०९ मध्ये चतुरासिंग महाराष्ट्राकडे निघाला. धारला त्याचा दोन वर्षे मुक्काम पडला.

[irp]

साताऱ्याचा बंदोबस्त दुसऱ्या बाजीरावाने त्याचा मित्र त्र्यंबकजी डेंगळे याचेकडे सोपविला होता. त्र्यंबकजी दूत पाठवून चतुरसिंगाला स्वदेशी येण्याचे आमंत्रण दिले. चतुरसिंगाने आधी बडोद्यास जाऊन तेथून काही मदत मिळेल काय, हे पाहिले. तेव्हा बडोद्याचा ब्राम्हण कारभारी गंगाधर शास्त्री याने त्याला स्पष्टपणे सांगितले की, ‘बडोद्यास इंग्रजांच्या सूचनेशिवाय झाडाचे पानही हलत नाही. तेव्हा तेथे तुमची काय डाळ शिजणार?”निराश होऊन चतुरसिंग खानदेशात आला. त्र्यंबकजीला तेच हवे होते. त्याने चतुरसिंगाला वकिलासमोर बेलभंडार उचलून शपथ घेतली की, ‘इकडे चतुरसिंगाच्या केसालाही धक्का लागणार नाही.’ १० फेब्रुवारी १८११ रोजी भेटीचा दिवस ठरविण्यात आला. गिरणा नदीच्या काठी चतुरसिंगाच्या छावणीतच मेजवानीचा थाट करायचा, त्र्यंबकजीने ठरविले. सहा घटका रात्रीला विचारविनिमय करायचे ठरले. रघुनाथराव गुजर, बापू फडणीस, अप्पाजीराव इंगळे, गोपाळराव न्यायाधीश, अप्पा पुणतांबेकर, त्याचे दोन भाऊ, बाबाजी केशव पाडळीकर, लाडेखान जामदार, हवालदार, खिजमतगार वगैरे मंडळी सह चतुरसिंग त्र्यंबकजीची प्रतीक्षा करीत बसला. सारे जण गप्पांत रंगले होते.पण हाय! त्यांच्या तंबुवर एकदम चहूबाजूंनी हल्ला झाला. हल्लेखोरांनी तंबूचे सगळे दोर एकदम कापून टाकले व तंबूच्या कनातीखाली आत बसलेल्या सर्वांना दाबूत धरले. नंतर सर्वांना कैद केले. त्र्यंबकजी तिकडे फिरकलाच नाही. चतुरसिंगाची सगळी छावणी लुटण्यात आली. दुसऱ्या बाजीरावाने अशा रीतीने छत्रपतींचा पराक्रमी भाऊ परस्पर जेरबंद करून टाकला व आपल्या मार्गातला काटा दूर केला. चतुरसिंग बाजीरावाला शत्रू वाटत असेल, पण तो खरा महाराष्ट्राचा शूर, स्वाभिमानी व जातिवंत पुत्र होता. याची जाणीव त्या लंपट, विलासी व इंग्रजांच्या हातातले बाहूले बनलेल्या दिवट्या बाजीरावाला कशी असणार?

त्र्यंबकजी सर्वांना घेऊन नासिकला आला. त्यावेळी बाजीरावाचा मुक्काम नासिकला होता. बाजीरावाने चतुरसिंगाला रायगड किल्ल्याजवळच्या कांगोरीच्या किल्ल्यात आणि चतुरसिंगाच्या साथीदारांना वेगवेगळ्या किल्ल्यांत तुरूंगात डांबण्याचा हुकुम सोडला. मराठा राज्याला दुसऱ्या नादान बाजीरावाच्या व पर्यायाने इंग्रज धूर्तांच्या पंजातून सोडविण्यासाठी अविरतपणे जिवाची बाजी लावून साह्यासाठी हिंदूस्थानभर पायपीट करणारा, स्वराज्यासाठी तळमळणारा व आटोकाट प्रयत्न करणारा स्वातंत्र्यवीर चतुरसिंग अखेर पेशवाईच्या तुरूंगात बुधवार दिनांक १५ एप्रिल १८१८ रोजी अमानुष हालअपेष्टा भोगीत अखेर कालकवलित झाला.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!