Home Study Material चक्र बिशोई

चक्र बिशोई

ओरिसा प्रांत – उल्कल राज्य जरी सन १७६५ च्या बक्सर युद्धानंतर इंग्रजांच्या अधीन झाले होते, तरी त्यातील फूलबनी जिल्हा इंग्रजांच्या स्पर्शापासून अलिप्त राहिला होता. या भागातील पहाडी क्षेत्रात ‘कन्ध’ या आदिवासींचा निवास होता. हा भाग डोंगरदऱ्या, नद्या व घनदाट अरण्यांची व्याप्त होता. त्यांचे वन सौंदर्य नंदनवनाचा आभास निर्माण करीत होते. या पहाडी क्षेत्राला ‘बोधमंडल’ किंवा ‘वनवासी -कुई सुद्धा म्हणत असत. या भागात आधी भंज वंशाचे राज्य होते. नंतर ते कुंजहार घराण्याकडे आले. या घराण्याच्या अनंग देव नामकराजाने शासन सुविधेसाठी या भागाचे २४ विभाग केले होते. या विभागांना उडिया भाषेत ‘मुठे’ म्हटले जाई. प्रत्येक मुठ्ठ्याचे शासन एकेका मुखियाकडे असे. या मुखियांना ‘बिशोई’ असे म्हटले जाई. या बिशोई पैकी चक्र बिशोई आणि त्याचे काका धौरा बिशोई एकोणवीसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात धुमसरचा राजा धनंजय भंजदेवाच्या सैन्यात सेनापती होते. धुमसर राज्याच्या सैन्यात सगळे सैनिक कन्ध या आदिवासी जमातीचेच होते.
सन १८३५ पर्यंत कंपनी सरकारच्या सैन्याने फूलबनी जवळच्या सर्व प्रदेशात आपले प्रभुत्व प्रस्थापित केले होते. आता कंपनी सरकारने फूलबनी क्षेत्र आपल्या ताब्यात घ्यायचे ठरवून त्यानुसार कारवाई सुरु केली. परंतु कंध वीरांनी त्याला जबरदस्त विरोध केला. धुमसरच्या आदिवासी सैन्याने चक्र बिशोई व धौरा बिशोई यांच्या नेतृत्त्वाखाली इंग्रजांना पुढे पाऊल टाकू दिलेच नाही. इंग्रज सेनापती सेल याने यासंबंधात म्हटले आहे. ‘ओरिसातली ही अत्यंत भीषण लढाई होती. हे युद्ध बरीच वर्षे चालले होते. आदिवासी कन्धवीर कोणत्याही परिस्थितीत इंग्रजांचे अधिपत्य स्वीकारण्यात तयार नव्हते.

[irp]

कर्नल सेल ने राजा धनंजय भंजदेवाला असा संदेश पाठविला की, ‘राजाने गंजमच्या इंग्रज कलेक्टरला नाम मात्र जरी सलामी दिली, तरी चालेल. त्याच्या राज्याचे स्वातंत्र्य अबधित राहील व कंपनी सरकार कसलाही कर त्याच्याकडून मागणार नाही.’ राजाने या संदेशातला कावा ओळखला व कर्नल सेलचा तो प्रस्ताव फेटाळून लावला. आणि सेलला उलट संदेश पाठविला की, “यापुढे आपली भेट युद्धभूमीवरच होईल? त्यानंतर राजा उदयगिरीला गेला. आपल्या सर्व मुट्ठा प्रधानांना (बिशोईंना) व आदिवासी योद्ध्यांना एकत्र जमवून प्राण असे पर्यंत इंग्रजांशी लढा देण्यास त्यांना प्रवृत्त केले. जमलेल्या सर्व वीरांनी आपल्या कट्यारीने आपल्या अंगट्याचे रक्त काढून त्या रक्ताने आपल्या कपाळावर टिका लावला. आणि इंग्रजांना आपल्या प्रदेशात पाऊलही ठेवू देणार नाही, अशी त्या सगळ्या वीरांनी शपथ घेतली. या घटनेनंतर त्या ठिकाणाचे नाव ‘टीकाबाली’ असे प्रचारात आले.
सन १८३६ च्या शेवट च्या काळात राजा धनंजय भंजदेव मरण पावला. तरी युद्धाचा भार चक्रबिशोई व धौरा बिशोई यांनी आपल्या शिरावर घेतला. आणि इंग्रजांविरुद्ध गनिमी काव्याने युद्ध सुरुच ठेवले. आता कॅ. रसेलशी त्यांना लढायचे होते. रसेलची छावणी गंजम जिल्ह्यातील रसेलकुंड या स्थानी सन १८६९ पर्यंत होती. तरी त्याला फूलबनी क्षेत्रात पाऊल सुद्धा टाकता आले नाही.

[irp]

चक्रबिशोईने आपल्या काकांशी विचारविनिमय करुन आपले मुख्य ठाणे टीकावाली येथून बिशीपाद येथे आणले. हे ठाणे चांगले सुरक्षित होते. चक्रबिशोई या ठाण्यावरुन आपल्या निवडक सैनिकांसह एखाद्या ससाण्यासारखी झडप अचानक इंग्रज सैन्यावर घालीत असल्याने बरीच वर्षे या मोहिमेत इंग्रजांना थोडेसुद्धा यश मिळाले नाही. चक्रबिशोईची शक्ती व सेनासंचालनाचे कौशल्य अप्रतीम होते. त्यामुळे त्याची कीर्ती चहुंदिशांना फैलावली. आसपासचे राजेसुद्धा त्याच्याकडे साहाय्यार्थ धाव घेत असत. १८४५ मध्ये त्याने अनुगुलचा राजा सोमनाथसिंहाला साह्य दिले होते.

चक्रबिशोईने सर्वसामान्य आदिवासी जनतेला सुद्धा इंग्रजाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली व आपले सैन्य वाढविले. धुमसर, बोध आणि दासपल्ला येथील लढायांत सर्वसामान्य आदिवासी जनतेने चांगलाच पराक्रम गाजविला.
सन १८४७ मध्ये मेजर बॅकफर्सन याने बोधच्या राजाला दगाबाजी करुन पकडल्याचे समजताच चक्रबिशोईने आपल्या साथीदारांसह त्याच्या छावणीवर अचानक हल्ला करुन सर्वांच्या देखत बोधच्या राजाला त्या छावणीतून सोडवून आणले. इंग्रजांचे सैन्य त्यामुळे दिङ्मूढ होऊन गेले. बॅकफर्सनला चक्रबिशोई आपल्या छावणीवर हल्ला करील, असे वाटत नव्हते. तो सुद्धा या घटनेने चकित होऊन गेला.

[irp]

सन १८५४ मध्ये कंपनी सरकारने कॅ. मॅक्लिन याला त्याच्या पलटणीसह फूलबनीमधला हा लढा दडपून टाकण्यासाठी खास करुन पाठविले. तो आपल्या सैन्यासह अनुगुल येथे जाण्यासाठी कुरुमाणिया दरीतून निघाला. त्या दरीतल्या घाटाची वाट इतकी चिंचोली होती की, घोडा मागे वळविणे अवघडच होते. एका बिकट ठिकाणी चक्राबिशोईने त्या सैन्यावर अचानक हल्ला केला व त्या सैन्याच्या रक्ताने तो घाटमार्ग लालेलाल करुन टाकला. मॅक्लिनला मागे फिरावे लागले. घोडे मागे वळविणे कठीण असल्याने त्याच्या उरलेल्या सैनिकांनी घोड्याचे लगाम काढून त्या मार्गावरच टाकून दिले. त्या पहाडावर लगामांचा मोठा ढीग तयार झाला. आदिवासींच्या कुई भाषेत लगामाचा पिकुडी असे म्हणतात. तेव्हापासून त्या पहडाचे नाव पिकुडी-पहाडी असे रुढ झाले. तेथून अत्यंत बिकट परिस्थितीत इंग्रज सैन्य चक्कापाद येथे आले. तेथल्या मुट्ठा प्रधानाने मॅक्लिनला साह्य दिल्याने फूलबनी क्षेत्रात इंग्रजांचा प्रवेश झाला व सन १८८० पर्यंत ते सारे क्षेत्र कंपनी सरकारच्या ताब्यात आले. तरीही अधूनमधून इंग्रज सैन्यावर कन्धवीर हल्ले करीतच होते.

[irp]

चक्रबिशोई कोणत्याही परिस्थितीत इंग्रजांच्या हाती जिवंतपणी पडले नाही. कन्धवीरांना गुप्तपणे मार्गदर्शन करीत अनेक वर्षे ते गनिमी काव्याने इंग्रजांशी लढत राहिले. त्यानंतर चक्रबिशोई कोठे व कसा लुप्त झाला, हे कोणीही सांगू शकले नाही. चक्राबिशोई केवळ वीर योद्धाच नव्हता, तर तो समाज -सुधारकही होता. कन्ध जातीत पूर्वापारपासून चालत आलेली नरबलीची प्रथा त्याने बंद करुन टाकली. ओरिसामधील हा महान क्रांतिकारक आदिवासींच्या स्वातंत्र्य – युद्धात ताऱ्याप्रमाणे चमकत राहिला. प्रस्थापितांनी मात्र त्याची दखल घेतली नाही. हे भारताचे दुर्दैव होय.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!