Home Study Material घासीसिंह

घासीसिंह

इंग्रजांच्या साह्याने मीर कासीम बंगालचा नवाब झाला. त्याच्या बदल्यात त्याने छोटा नागपूर जवळचा मेदिनीपूर जिल्हा इंग्रजांना १७६० मध्ये दिला. आता इंग्रज छोटा नागपूरकडे वळले व त्यांनी सिंहभूम जिल्हा वगळता सगळा छोटा नागपूरचा भाग आपल्या ताब्यात घेतला. संबलपूर पासून कलकत्त्यापर्यंत सडक तयार करणे व ओरिसातील कटकपासून वाराणसीपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी सिंहभूम जिल्हा इंग्रजांना आपल्या ताब्यात घेणे अत्यावश्यक वाटले. म्हणून त्यांनी सन १८१८ मध्ये सिंहभूमच्या राजाशी तह केला. त्यात राजाचा वैयक्तिक स्वार्थ साधला; पण खरसवानचे ठाकूर चेतनसिंह आणि सेराईकेलाचे कुंवर विक्रमसिंह इंग्रजांशी समझोता करण्यास मुळीच तयार नव्हते. या प्रदेशात ‘हो’ या आदिवासी जातीचे लोक राहात असत. ते अत्यंत स्वातंत्र्यप्रिय होते. त्यांनी आपला नेता घासीसिंह याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांशी लढा द्यायचे ठरविले. त्यांची परंपरागत हत्यारे होती धनुष्यबाण व परशु. परशु म्हणजे अत्यंत धारदार कु-हाड.
‘हो’ हे आदिवासी जातीवर लूटमार करणे व हत्या करणे हा आरोप ठेवून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या बहाण्याने सिंहभूम वर हल्ला करुन या आदिवासींना कप्त्यात घेणे, हा उद्देशाने त्यांनी पोरहाटच्या राजाला आपल्याकडे वळवून घेतले. हा प्रदेश आपल्या ताब्यात घेण्याचा इंग्रजांना आणखी एक उद्देश होता. मद्रास ते कलकत्ता हा मोठा मार्ग तयार करणे. म्हणजे आपल्या ताब्यातील प्रदेश परस्परांसाठी जोडण्याकरीता सिंहभूम जिल्ह्यावर ताबा मिळवणे, हाच अंतःस्थ हेतू त्यांचा होता.

मेजर रफरेज आपल्या सैन्यासह चाईबासा येथे येऊन ठाकला. त्याच्या आदेशानुसार पोरहाटचा राजा व अन्य राजेही त्याला साथ देण्यासाठी आहे. ते पाहून घासीसिंह खवळला. त्याच्या ‘हो’ वीरांनी तेथला बांध फोडून टाकला. सारे पाणी वाहून गेले. सैन्याला पिण्यासाठीही पाणी उरले नाही. नंतर ‘हो’ वीरांनी मेजर रफरेजच्या सैन्याला चहुबाजूंनी घेरले. त्यांनी सिंहभूमच्या राजालाही हाकलून दिले. मेजर रफरेजच्या साह्याला लेफ्टनंट मेलर्ड आपल्या सैन्यानिशी येत असताना ‘हो’ वीरांनी त्याला मध्येच अडवून ठेवले. त्यांच्यात तुंबळ युद्ध झाले. दोन्ही बाजूचे अनेक सैनिक मारले गेले. त्यानंतर सारे ‘हो’ वीर डोंगरांच्या आश्रयाला निघून गेले. मेलर्डला समजले की, ‘हो’ लोक कुटियालोर येथे एकत्र होऊन आक्रमणाची तयारी करीत आहेत. तेव्हा त्याने कुटियालोरकडे कूच केले व त्यांच्यावर हल्ला केला. अनेक गावे जाळून बेचिराख केली. ‘हो’ वीरांनी आपल्या बाणांच्या माऱ्याने इंग्रजांशी जबरदस्त सामना दिला. पण बंदुकांसारख्या आधुनिक शस्त्रांमुळे ‘हो’ वीरांना पराक्रमी असूनही माघार घ्यावी लागली. गुमला, अदेजानदिया, वंशवीर, जयंतगड ही स्थाने ताब्यात घेताना इंग्रजांची फार मोठी हानी झाली.
६ एप्रिल १८२० रोजी गमदिया जवळ ‘हो’ वीरांनी मे रफरेजच्या सैन्यावर मोठे आक्रमण केले. तेव्हा त्याला आपले प्राण वाचविणेही अशक्य झाले. तेव्हा बाबू अजेबरसिंहाच्या साह्याने तो सिंहभूम जिल्ह्याबाहेर पळून गेला.

इंग्रजांचा प्रतिनिधी बरकानदीपचा सुभेदार याने दगाबाजीने घासीसिंहाला कैद केले. त्याच्या साथीदारांनी गुलमापीर भागाचा मुखिया ‘हो’ आदिवासी कोडो पेंटरच्या तरुण मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे ‘हो’ वीर संतापले. ते पुरुलिया येथे संगठित झाले व त्यांनी त्या सुभेदारावर संगठितपणे हल्ला केला. ३१ जानेवारी१८२१ रोजी त्या वीरांना त्या सुभेदाराला त्याच्या पंधरा साथीदारांसह ठार केले. तसेच पोरहाटच्या राजाच्या दोन मंत्र्यांनाही ठार केले. त्यात त्यांचे २० घोडे मारले गेले.

[irp]

‘हो’ वीरांनी चंग बांधला की, कोणत्याही परिस्थितीत इंग्रजांना आपल्या सिंहभूम जिल्ह्यातून हाकूनच द्यायचे. घासीसिंहाचे गुमलापीरचे नातेवाईक आता ‘हो’ वीरांचे नेतृत्व करु लागले. त्यांनी ६ फेब्रुवारी १८२१ रोजी सिनेपूरच्या किल्ल्यावर हल्ला केला. मेजर रफरेजला कोठूनही मदत मिळू नये, म्हणून त्यांनी त्या भागातील सर्व रस्त्यांची व घाटांची नोकेबंदी केली. इंग्रज सरकारच्या रतनसिंह जमादाराला इंग्रजांकडून निपूरचा किल्ला मिळाला होता. ‘हो’ वीरांना घाबरुन त्याने तो किल्ला त्यांच्या ताब्यात घेऊन टाकला ‘हो’ आदिवासींचा हा फार मोठा विजय आहे, असे रफरेज ही म्हणाला. त्यानंतर इंग्रजांनी ‘हो’ वीरांशी समझोता केला. नंतर आठ नऊ वर्षे शांततेत गेली.

[irp]

फेब्रुवारी १८३० मध्ये १२०० ‘हो’ वीरांनी इंग्रजांनी समझोता तोडला म्हणून जयंतगडावर हल्ला केला. इंग्रज सरकारने त्या गडावर नियुक्त केलेला रघुनाथ बन्सी त्या गडातून जीव घेऊन पळून गेला. ‘हो’ वीरांनी तो गड नष्टभ्रष्ट करुन टाकला. जयंतगडावरील पराभवाने इंग्रजांचा जळजळाट झाला, परंतु आपल्या पराभवाचा बदला घेण्यास ते असमर्थ होते.

[irp]

१ डिसेंबर १८३१ पासून पुन्हा ‘हो’ वीरांचा विद्रोह सुरु झाला. छोटा नागपूरपासून अवधच्या सीमेपर्यंत भडकत राहिला. या विद्रोहाचे नेतृत्व ‘हो’ ‘लरका हो’ आणि ‘कोल’ या आदिवासी जातींच्या नेत्यांनी केले. त्याची आग १८३७ पर्यंत या प्रदेशात धुमसत होती. आपल्या परंपरागत साध्यासुध्या हत्यारांनी ‘हो’ आणि ‘कोल’ वीरांना आधुनिक शस्त्रास्त्रांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी जी दीर्घकाळ झुंज दिली, ती अद्वियच म्हटली पाहिजे. घासीसिंहाने आपल्या या जमतींच्या अंतःकरणात पेटविलेल्या स्वातंत्र्याच्या ज्योतीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले सोनेरी पान जोडले आहे, हे निर्विवाद होय. या संग्रामालाच ‘कोल विद्रोह’ अथवा ‘कोल संग्राम’ म्हणतात.

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!