Home Study Material गणपत राय

गणपत राय

छोटा नागपूरमधील पोठिया गावचे जमीनदार गणपत राय कुशल प्रशासक, साहसी वीर व बहाद्दूर स्वतंत्रता सेनानी होते. त्यांचे पोठिया गाव रांची जिल्ह्यातील कोकडा परगण्यात आहे. ते जातीने कायस्थ होते. ते वर्णाने सावले, सामान्य उंचीचे,मध्यम शरीरयष्टीचे पण काटक होते. बालपणापासूनच त्यांची बुद्धी कुशाग्र होती. तरूणपणीच त्यांचे व्यावहारिक चातुर्य व प्रशासन करण्याची योग्यता पाहून छोटा नागपूरचे राजा जगन्नाथ शाह यांनी गणपतरायची नेमणूक आपल्या दरबारात दिवाणपदी केली होती. गणपत राय चांगल्या रीतीने राज्यकारभार चालावा म्हणून झटत होते. परंतु राजा जगन्नाथ शाह विलासप्रिय, अकार्यक्षम आणि निष्क्रीय असल्याने गणपत राय यांची राज्याचा कारभार करण्यात कुचंबना होत असे. त्यामुळे राजा व गणपत राय यांच्यात मतभेद उत्पन्न झाला. शेवटी दिवाण पदाचा त्याग करून गणपत राय आपल्या गावी येऊन आपली जमीनदारी सांभाळू लागले तसेच धर्मग्रंथांचे पठण करीत कालक्रमणा करू लागले.

सन १८५७ च्या स्वातंत्र्य-युद्धाच्या बातम्या छोटा नागपूर भागात येऊ लागल्या. त्या ऐकन गणपत राय बैचेन झाले व आपणाही या स्वातंत्र्य-युद्धात काहीतरी केलेच पाहिजे असा निर्णय त्यांनी घेतला. ३१ जुलै १८५७ रोजी डोरंडा छावणीतील देशी सैनिकांनी जमादार माधवसिंह व नादिरअली यांच्या नेतृत्वाखाली इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारले. २ ऑगस्ट रोजी या सैनिकांनी रांची शहरावर तोफा डागून ते शहर ताब्यात घेतले. राचींचा कमिशनर डाल्टन, कलेक्टर डेव्हिस, न्यायाधीश ओक्स, पोलिस प्रमुख बर्च यांचेसह सगळे इंग्रज तेथून पळून गेले. तुरूंग फोडून ३०० संथाल कैद्यांना मुक्त केले. कमिशनर डाल्टन; कलेक्टर डेव्हिस, जज्ज ओक्स आदि इंग्रज अधिकाऱ्यांची घरे लुटून जाळून टाकली. माधवसिंह, नादिरअली व जयमंगल सिंह यांच्या नेतृत्वाखाली ते सैन्य बडकागडचे राजा विश्वनाथ शाहदेव यांना जाऊन मिळाले. विश्वनाथ शाहदेव १८५३ पासूनच इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी तयारी करीत होते. सर्वांनी विश्वनाथ शाहदेव यांना छोटा नागपूरच्या सुभेदार पदी नियुक्त केले. विश्वनाथ शाहदेव छोटा नागपूरचा राज्यकारभार पाहू लागले.

गणपतरायला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांना अत्यानंद झाला. ऑगस्ट १८५७ च्या शेवटच्या आठवड्यात ते डोरंडा येथे येऊन या क्रांतिकारी नेत्यांना येऊन मिळाले. दिल्लीला बादशहा बहादुरशाह जफर यांना हिंदुस्थानचा सम्राट घोषित केल्याचीबातमी जेव्हा या क्रांतिकारी नेत्यांना समजली, तेव्हा आपणही बादशहाला मदत करावी, आपला सर्व देश स्वतंत्र करण्यासाठी दिल्लीला जावे, त्याचकाळात जगदीशपूरचे कुँवरसिंह यांनी त्यांना मदतीसाठी रोहतासगडला बोलावले. कुँवरसिंहा समवेत दिल्लीला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दिल्लीला जाऊन सम्राट बहादूरशाह जफर यांच्याकडून छोटा नागपूरच्या प्रशासनाची सनदही प्राप्त करता येईल, असा त्यांचा विचार होता. छोटा नागपूरच्या विलासी राजाला पदच्युत करून आपण चांगल्या रीतीने छोटा नागपूरचा राज्यकारभार करू असा आत्मविश्वास गणपत रायला होता. त्यांनी सर्व नेत्यांना दिल्लीला जाण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच यासाठी दहा हजार सैनिक, हत्ती, घोडे, बैलगाड्या यांच्यासाठी रसद पुरविण्याचे वचन ही गणपतरायने त्या नेत्यांना दिले. सर्व नेत्यांनी गणपतरायला आपला सेनाप्रमुख केले. परंतु राजा विश्वनाथ शाहदेव यांना या सर्व नेत्यांचा दिल्लीला जाण्याचा विचार अव्यावहारिक व घातक वाटला म्हणून त्यांनी दिल्लीला जाण्यास विरोध केला त्यामुळे मतभेद निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी जयमंगल पांडेने सर्व नेत्यांची बैठक घेतली पण मतभेद दूर न होता वाढला.

दिल्लीला जाण्याचे निश्चित झाले. गणपत रायला रसद मिळवून देण्याचे सांगण्यात आले पण त्याला रसद मिळविता आली नाही. तेव्हा जयमंगल पांडेने विश्वनाथ शाहदेव,गणपतराय आदि सहा नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यासाठी व आपल्याबरोबर त्यांना नेण्यासाठी पकडून आणण्यास सैनिकांना सांगितले.

[irp]

सैनिकांनी त्यांना आणले तेव्हा सर्वांनी दिल्लीकडे कूच केले. २०० घोडेस्वार, ६०० सैनिक, चार तोफा व ४६ बैलगाड्यांतून रसद घेऊन ते निघाले. बरियात वस्तीत त्यांचा पडाव पडला असतांना विश्वनाथ शाहदेव व गणपत राय यांच्यासह चार नेत्यांना मुक्त करण्यात आले.

[irp]

२ ऑक्टोबर १८५७ रोजी या सैन्याची गाठ इंग्रज सैन्याशी पडली. तुंबळ युद्ध झाले. इंग्रज सैन्याने त्यांना पराभूत केले. ऑक्टोबर १८५७ पासून मार्च १८५८ पर्यंत गणपत रायने विश्वनाथ शाहदेवसह सहा महिने इंग्रजांशी लढा दिला. २० सप्टेंबर १८५७ लाच इंग्रजांनी दिल्ली ताब्यात घेतली होती. २३ सप्टेंबर रोजी इंग्रजांनी रांचीवर ताबा मिळविला होता. छोटा नागपूरचा राजा जगन्नाथ शाह गणपत रायला अटक करण्यासाठी इंग्रज कॅप्टन नेशन व कॅप्टन ओक यांना मदत करू लागला. अखेर नवागड भागातील करसारच्या युद्धात विश्वनाथ शाहदेवसह गणपतरायला इंग्रजांनी कैद केले. मेजर ओक्सच्या न्यायालयात खटला दाखल करून विश्वनाथ शाहदेव आणि गणपत राय यांना फाशीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. २१ ऑक्टोबर १८५८ रोजी रांची जिल्हा स्कूलच्या गेट जवळील कदंब वृक्षावर गणपतरायला फाशी देण्यात आली. स्वातंत्र्यासाठीतळमळीने अथक प्रयत्न करणारा हा स्वातंत्र्यवीर हे जग सोडून गेला. छोटा नागपूरची जनता असहाय झाली. आता तळमळत जगण्याशिवाय त्या जनतेला कोणताही पर्याय उरला नाही. तेव्हापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत छोटा नागपूरची जनता इंग्रज अधिकाऱ्यांच्या अत्याचारांखाली भरडतच राहिली. या नेत्यांना फाशी देण्यात आल्याने छोटा नागपूरच्या जनतेने पुन्हा उठाव करू नये म्हणून डाल्टनने जेल-बाजारासमोर दोन तोफा इंग्रज गोलंदाजासह कायमच्या ठेवून दिल्या होत्या. अशा रीतीने छोटा नागपूरचा स्वातंत्र्यलढा इंग्रजांनी दडपून टाकला.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!