Home Study Material खान बहादुर खान

खान बहादुर खान

रोहिलखंड अवधचा नबाब शुजाउद्दौला याने इंग्रजांच्या मदतीने जिंकले. रोहिलखंडात बरेली, शाहजहाँपूर, बिजनौर व मुरादाबाद इ. जिल्हे होते. रोहिलखंडाची राजधानी बरेली ही होती. पुढे वीस पंचवीस वर्षांतच इंग्रजांनी रोहिलखंड आपल्या अवधच्या तैनाती फौजेच्या खर्चासाठी अयोध्येच्या नबाबाकडून आपल्या ताब्यात घेतले.

नबाब झुल्पिकारखान हा काही काळ बरेलीचा सुभेदार होता. त्याच्यानंतर त्याचा नातू खान बहादूरखान याच्याकडे बरेलीची सुभेदारी आली. त्याचे घराणे खानदानी होते व बरेली जिल्ह्यात प्रतिष्ठित मानले जात होते. खान बहादुर खान हा इंग्रज राजवटीत सदर अमीन (मॅजिस्ट्रेट) सुध्दा होता. सन १८५७ मध्ये १० मे रोजी मेरठला देशी शिपायांनी उठाव केला. तेथल्या इंग्रजांनी कत्तल केली. हे समजल्यावर रोहिलखंडाचा कमिशनर अॅलेक्झांडर याने बहाद्दुरखानाला बोलावून घेतले व त्याला सांगितले की, तुम्ही आपल्या प्रदेशात शांतता राखण्यासाठी आम्हांस मदत करावी. बहादुर खानाने सांगितले की, या काळात ते माझ्या कुवतीतले नाही, म्हणून मी तशी व्यवस्था करण्यास असमर्थ आहे. एवढ्यावरच तो विषय बहादुरखानाने संपविला.
३१ मे १८५७ रोजी बरेली छावणीतील देशी पलटणीचे विद्रोह सुरु केला. काही इंग्रज अधिकाऱ्यांची कत्तल केली. काही इंग्रज नैनीतालला पळाले. सुभेदार बख्तखाँ याने खान बहादुरखानाला बरेली परगण्याचा राज्यकारभार हाती घेण्याची विनंती केली. खान बहाद्दुरखानाने बरेलीचा राज्य कारभार आपल्या हाती घेतला. त्याने एक सल्लागार मंडळ नेमले. बख्तखाँजवळ बादशहा बहादुरशाह जफर याच्यासाठी नजराणा व छावणीतला खजिना देऊन पाच हजार सैन्यासह दिल्लीला पाठविले. बहादुरशाहने खान बहाद्दुरखान याला बरेलीचा सुभेदार म्हणून हुकूम पाठविला. बरेली परगण्यावर बहादुरशाहचे वर्चस्व सुरु झाले. खान बहादुरखान याने बरेली परगण्यात प्रमुख ठिकाणांवर तहसीलदारांच्या नेमणुकी केल्या. ठिकठिकाणी पोलीस ठाणी नेमली. बहादुरशाहच्या शिक्क्याची नाणी तयार करण्यासाठी टाकसाळ सुरु केली. बरेली परगण्यात सर्वत्र शांतता राखण्याची तजवीज केली. ठाकूर जयमलसिंगाकडे महसूल खाते सोपविले. ठाकूर रघुनाथसिंहाला ‘राजा’ ही पदवी दिली. त्याच्याकडे फरिदाबादचा परगणा दिला.

तोफखाना तयार केला. ५० हजारांवर सैन्य जमा केले. मौलवी अहमदुल्ला शाह, नानासाहेब पेशवे, फिरोजशहा इ. विद्रोही नेत्यांशी संबंध स्थापन केले. खानबहाद्दुरखानाच्या कारकीर्दीत स्वस्ताई होती. सर्वत्र शांतता होती. हिंदू-मुस्लिम जनता गुण्या गोविंदाने नांदत होती. बरेली शहर तर वैभवात होते. त्याने धर्मशाळा, मशिदी, रस्ते बांधण्याचे काम सुरु केले होते. शस्त्रास्त्रे तयार करण्याचे काम जोरात सुरु होते. प्रत्येक बाबीत बरकत होती. तो प्रजाहितदक्ष व लोकप्रिय होता. विद्रोही सैनिक घोड्यांवर बसून सर्वत्र हिंडत असत – ‘हिंडतांना इस्लाम का बोलबाला, फिरंगी का मुँह काला,’ अशी घोषणा देत असत.
बहादुरखानाच्या सल्लागारांत मुसलमानाबरोबर हिंदूही होते. त्याने गोवधबंदीचा हुकूम काढल्याने हिंदू जनता ही त्याच्यावर प्रसन्न होती. त्याचा दिवाण शोभाराम हा हिंदू होता.

खान बहादुरखानाने नैनीतालमधून इंग्रजांना हाकून लावण्यासाठी बंदे मीरखान व अलीखान मेवालीच्या नेतृत्वाखाली काही सैन्य नैनीतालकडे पाठविले. नंतर हैदरखान व फजले हक आपले सैन्य

घेऊन त्यांना येऊन मिळाले. ते कळताच इंग्रज सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. तरीही ते लालडांगी येथे तळ ठोकून राहिले. इंग्रजांनी आपली बायकामुले अल्मोड्याला पाठवून दिली.

[irp]

इंग्रजांनी तीन बाजूंनी रोहिलखंडावर हल्ला करायचे ठरविले. सरसेनापती सलकॉलिन, ब्रिगेडिअर जनरल वॉल पोल, मेजर जनरल पेनी, ब्रिगेडिअर जनरल जोन्स यांनी गंगेच्या डाव्या तीराकडून, फत्तेगड कडून, रुडकीकडून हल्ले करायचे ठरविले. कोणी कोठे कोणाशी येऊन मिळायचे हेही ठरविण्यात आले. पेनी मेरठहून निघाला. वॉलपोलला रौया येथे देशी सैन्याशी लढत द्यावी लागली. तेथील सरदार नरपतसिंहाने त्याचा चांगलाच प्रतिकार केला. या युद्धात कर्नल ऑट्रियनहोप ठार झाला. दुसऱ्या हल्ल्याच्या वेळी नरपतसिंह किल्ल्यातून निघून गेला. पेनीच्या सैन्याला कुकरौली येथे देशी सैन्याने घेरले.त्याने त्या सैन्याला हरवून मुरादाबादला तळ ठोकला. पेनीही त्या युद्धात मारला गेला. जोन्सचे हरिद्वार जवळून गंगा ओलांडून तो बरेलीपासून चौदा मैलावरील मीरगंज येथे आला. पेनीची तुकडी घेऊन सर कॉलिन बरेलीजवळ येऊन ठेपला.

खान बहादुर खान युद्धासाठी तयारच होता. त्याने फौजेचे नेतृत्व बंदे मीरखान, वलीदादखान व फिरोजशहा यांच्याकडे दिले. त्यांच्या सैन्यात गाझींची (काफिरांवर विजय मिळविणारांची) एक तुकडी ही होती. हे लोक इंग्रजांना काफिर समजत जिवावर उदार होऊन लढण्याचा त्यांचा मुख्य धर्म होता. ५ मे १८५८ रोजी युद्ध सुरु झाले. धर्माकरता बळी जाण्यासाठी गाझी तत्पर होते. दीन दीनच्या घोषणा देत ते इंग्रजसैन्यावर तुटून पडले. एका तरुण गाझीने फार मोठा पराक्रम गाजविला. तो जखमी झाला होता. शरीरातून सगळीकडून रक्त वाहात होते. तरी तो लढायला पुढे आला. इंग्रज सैनिकांनी त्याच्या अंगात संगिनी खुपसून त्याला ठार केले.

[irp]

बहादुरखानाच्या सैन्याने व गाझींनी इंग्रज सैन्यावर निकराचे हल्ले केले. पण इंग्रजांच्या तुफान गोळीबारामुळे रोहिले नामोहरम झाले. या युद्धात फिरोजशहाने आपल्या पराक्रमाची शर्थ केली. इतर सरदार सुद्धा प्राणपणाने लढले. त्या रात्री खान बहादुरखान याने बरेली सोडले व तो तराईकडे निघून गेला. इंग्रजांनी बरेली शहर ताब्यात घेतले. लोक घरेदारे सोडून वाट दिसेल, तिकडे पळून गेले. पुष्कळ घरंदाज स्त्रियांनी नाटाळमोहल्ल्याच्या मशिदीजवळील अथांग पाण्याच्या विहिरीत जीव दिले. बरेली शहरावर स्मशानकळा आली. इंग्रजांनी अनेक लोकांना ठार केला. लूटमार केली.

तराईच्या जंगलात लढत असतांना खान बहाद्दुरखान घोड्यावरुन खाली पडला. इंग्रजांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर खटला भरण्यात आला व १८६० च्या सुरुवातीला त्याला कोतवाली समोर फांशी देण्यात आले.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!