Home Study Material कुशलसिंह चंपावत

कुशलसिंह चंपावत

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध १० मे १८५७ पासून सुरु झाले व ५/६ दिवसांतच दिल्ली क्रांतिकारकांच्या ताब्यात आली. त्यांनी बहादुरशाह जफरच्या नेतृत्त्वाखाली हे युद्ध सुरु ठेवले. त्या काळात इंग्रजांना आपल्या देशातून हाकून लावणे, ही साधी गोष्ट नव्हती. भरपूर मनुष्यबळ, पुष्कळशी संपत्ती व पुरेपूर शस्त्रसाठा त्यासाठी अत्यावश्यक होता. पण बहादुरशाहजवळ ना मनुष्यबळ होते, ना धन होते, ना शस्त्रांचा साठा होता. इंग्रजांच्या पलटणीतले बंडखोर सैनिक दिल्लीत हजारोंच्या संख्येने आले होते, येत होते. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्याची जबाबदारी बादशाहवरच होती. म्हणून बहादुरशाह जफरने दिल्लीच्या तख्ताचे पूर्वीचे राजनिष्ठ व संबंधित अशा जयपूर, जोधपूर, बीकानेर व अलवार राजांना पत्रे लिहिली, त्यात त्याने त्या राजांना आवाहन केले होते की,
____ “माझी अशी उत्कट अभिलाषा आहे की, इंग्रजांच्या दास्याच्या शृंखला तोडून छिन्नभिन्न करुन टाकाव्या कोणत्या का उपायाने होईना, पण संपूर्ण हिंदुस्थानला इंग्रजांच्या दास्यातून मुक्त करावे, अशी माझी तीव्र इच्छा आहे. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीच्या या उद्दिष्टासाठी लढले जाणारे हे क्रांतियुद्ध तेव्हाच सफल होईल, जेव्हा एखादा रणशूर व्यक्ती रणभूमीवर उतरुन या महान आंदोलनाचे संचालन करील, राष्ट्रातील विभिन्न शक्तींना एका सूत्रात बांधील आणि या संपूर्ण अभियानाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेईल. “इंग्रजांना आपल्या देशातून घालवून दिल्यावर मला या देशावर राज्य करण्याची, सत्ताधीश होण्याची मुळीच इच्छा नाही. जर सारे राजे या स्वातंत्र्ययुद्धात सामील होऊन लढतील, तर मी स्वच्छेने व प्रसन्न मनाने माझे सर्व अधिकार व सत्ता तुम्ही निवडलेल्या राज-मंडळाच्या हाती सुपूर्द करीन व त्यातच मला आनंद मिळेल.”

परंतु दुर्दैव असे की, ते सारे राजपूत राजे महाराजे आपल्या स्वाभिमानी व पराक्रमी जातीची आन विसरले आणि लाचार होऊन इंग्रजांचे साहाय्य कर्ते बनले. तरीही त्यांच्या सैन्यात आणि इंग्रजांच्या देशी पलटणीतील सैन्यात आपल्या पूर्वजांची परंपरा चालविणारे हजारो राजपूत वीर होते. त्यांनी निष्ठेने क्रांतिकारकांना साथ दिली.
२१ ऑगस्ट १८५७ रोजी जोधपूर राज्यातील एरिनपूरा छावणीतील देशी सैनिकांनी विद्रोहाची ज्वाला प्रज्ज्वलित केली, त्या सैनिकांत बहुसंख्य राजपूत सैनिक होते. ‘चलो दिल्ली-मारो फिरंगी’ अशा घोषणा देत ते सैन्य दिल्लीकडे निघाले. त्यांचा पहिला पडाव मारवाडमधील आहुजा नगरीजवळ पडला. तेथील ठाकूर कुशलसिंह चंपावत या राजाने त्या सैनिकांचे नेतृत्व स्वीकारले. आसोप, गुलर आणि आलनियावास येथले ठाकूरही आपल्या सैन्यांसह त्यांना येऊन मिळाले. तेव्हा त्या सैनिकांची संख्या सहा हजारपर्यंत झाली होती.

[irp]

अजमेरचा चीफ कमिशनर पेट्रीक लॉरेन्स याने या सैन्याच्या प्रतिकारासाठी जोधपूरच्या राजपूत राजाला सैन्य पाठविण्यास सांगितले. जोधपूरचा राजा तख्तसिंह याने आपला किल्लेदार ओनाडासिंह पवार याच्या नेतृत्वाखाली दहा हजार सैन्य व बारा तोफा त्यासाठी पाठविल्या. ज्याच्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष दिल्लीच्या तख्ताची सेवा केली, त्या तख्ताच्या संरक्षणासाठी जोधपूरच्या राजाने सैन्य व रसद न पाठविता तीच मदत त्या तख्ताच्या विनाशासाठी परक्या इंग्रजांच्या सहायार्थ मात्र सैन्य व रसद पाठवावी, केवढा हा दैवदुर्विलास! जोधपूरच्या राजाचे सैन्य क्रांतिकारकांच्या सैन्याच्या दीड पटीपेक्षा माठे असले तरी क्रांतिकारकाच्या सैन्याने जोधपूरच्या सैन्याची धूळधाण उडवून दिली व त्याच्या सर्व तोफा सुद्धा आपल्या ताब्यात घेतल्या. जोधपूरचा किल्लेदार ओनाडासिंह व त्याचे काही सैन्याधिकारी आपल्या शेकडो सैन्याकांसह या युद्धात ठार झाले. नंतर चीफ कमीशनर पेट्रीक लॉरेन्स व जोधपूरचा पोलिटिकल एजंट आपले सैन्य घेऊन त्या क्रांतिकारकांचा प्रतिकार करण्यासाठी आहुवा येथे आले. १८ डिसेंबर १८५७ रोजी दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला. त्यात मेसन ठार झाला. शेकडो सैनिक ठार झाले व पेट्रीक लॉरेन्सही जीव घेऊन पळून गेला.

गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगला जेव्हा हे वृत समजले तेव्हा त्याने २० जानेवारी १८५७ रोजी पालनपूर व नसिराबाद येथील छावण्यातून मोठे सैन्य आहुवा येथे पाठवून दिले. त्या सैन्यापुढे क्रांतिकारकाच्या सैन्यांचा टिकाव लागला नाही. कुशलसिंह चंपावतसह क्रांतिकारकाचे अनेक नेते पकडले गेले. त्यांना बंदीवासाच्या कठोर शिक्षा देण्यात आल्या.

[irp]

जवळच्या कोटा येथील छावणीतही बातमी पोचली. त्या छावणीतील देशी सैन्याने १५ ऑक्टोबर १८५७ रोजी उठाव केला. त्या सैनिकांनी कोटाचा रेसिडेंट बर्टन आणि काही इंग्रज अधिकाऱ्यांना ठार केले. त्यांनी कोटा राज्याचा खजिना, शस्त्रभंडार व धान्यसाठा आपल्या ताब्यात घेतला. कोटाचे रावरामसिंह यांना नजरकैदेत ठेवून दिले आणि राज्याचा बहुतेक भाग आपल्या ताब्यात घेतला. सहा महिने कोटा राज्य स्वातंत्र्याचा उपभोग घेत होते.

अहुवा येथील क्रांतिकारकांच्या सैन्याचा पराभव केल्यानंतर इंग्रजांचे सैन्य कोटा येथे आले. त्यांनी कोटा येथील विद्रोही सैन्यावर जबरदस्त हल्ला केला. त्या मोठ्या सैन्यापुढे कोटाच्या क्रांतिकारी सैन्याचा टिकाव लागला नाही. अनेक क्रांतिकारी सैनिक या युद्धात कामास आले. त्या क्रांतिकारी सैन्याच्या दोन्ही नेत्यांना जयदयाल आणि महाराव खानाला कैद केले व नंतर त्यांना फासावर चढविण्यात आले. विशेष हे की, पालनपूर व नसिराबाद छावणीतील गोऱ्या सैनिकांबरोबर देशी सैनिकांनी आपल्या देशातील क्रांतिकारी सैन्याचा पराभव करून इंग्रजांना साह्य केले. याला आपल्या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!