Home Study Material कुँवर सिंह

कुँवर सिंह

बिहारच्या शाहाबाद जिल्ह्यात जगदीशपूरची जहागिरी सर्वात मोठी होती. तेथील जहागिरदार साहबजादा सिंह मोठे रुबाबदार व गोरगरीबांचे कनवाळू होते. सारावसुलीसाठी ते आपल्या रयतेवर कधीही जुलूम करीत नसत. काही कारणास्तव कंपनी सरकारने त्यांना सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा दिली होती. ते पाटण्याच्या तुरुंगात असताना एक वाघ त्या तुरुंगात शिरला. तेव्हा त्यांनी आपल्या तलवारीने त्या वाघाचे तुकडे करून टाकले. त्यांच्या या पराक्रमामुळे कंपनी सरकारने त्यांना मुदतपूर्वीच तुरुंगातून मुक्त केले.

साहबजादासिंहांना चार पुत्र होते. कुँवर सिंह, दयालसिंह, राजपतसिंह आणि अमरसिंह. त्यापैकी मोठे कुँवरसिंह व छोटे अमरसिंह हे दोघे १८५७ च्या क्रांती युद्धात आपले नाव अमर करून गेले. साहबजादासिंह यांचे निधन १८२६ साली झाले. तेव्हा जहागिरीच्या वाटपावरून चौघा भावात वाद निर्माण झाला. त्याचा निकाल लागला. तेव्हा कुँवरसिंहाच्या वाट्याला जहागिरीचा मोठा भाग आला व उरलेला भाग तिन्ही लहान भावांत समसमान वाटून देण्यात आला आणि वाद संपला.
कुँवरसिंहाचा जन्म सन १७८२ मध्ये झाला होता. साहाबजादासिंह जन्म १७८२ मध्ये झाला. साहबजादासिंहाने आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यांना शिकविण्यासाठी एक मौलावी मात्र ठेवला होता. त्याने चारही मुलांना फारसी भाषेचे ज्ञान करून दिले. कुँवरसिंहाचे लक्ष त्या शिक्षणात फारसे नव्हतेच. धनुष्यबाण, भाला, बरची, तलवार चालविण्यात व घोडेस्वारी करण्यात त्यांना विशेष रस होता. शिकार खेळण्यात त्यांना फार आनंद वाटायचा. ते मोठे झाल्यावर जितौरा गावाजवळच्या त्यांच्या बंगल्यात राहत असत. त्यांची आई पंचरत्न कुँवर शेजारच्या दलीपपूर नामक गांवात राहत असे. कुँवरसिंह सुद्धा त्यांच्याकडे राहायला जात असत.

कुँवरसिंहाने एक रखेली धरमन बिबी ही मुसलमान सुंदरी होती. तिच्यासाठी त्यांनी जगदीशपूरला व अग्ऱ्याला मशिदी बांधल्या. तसेच अन्य ठिकाणीही मंदिर व मशिदी बांधल्या. ते सर्व धर्मांना सामान मानीत असत. त्या चौघा भावांपैकी दयालसिंह व कुँवरसिंहाचा पुत्र दलभजनसिंह यांचे निधन कुँवरसिंहांच्या निधना आधीच झालेले होते. कुँवरसिंहांचे तिघे लहान भाऊ फारच खर्चिक होते. त्यांना त्यांच्या मालमत्तेच्या किंमतीपेक्षाही जास्त कर्ज झाले होते. सावकारांनी त्या तिघांच्यावर दावा लावला. तेव्हाकुँवरसिंहांनी त्यांच्या कर्जाची हमी घेऊन हप्तेबंदीने ते कर्ज फेडायचे कबुल केले व आपल्या राजपूत घराण्याची इज्जत राखली. कुँवरसिंह जेव्हा जगदीशपूरच्या गादीवर बसले, तेव्हा त्यांचे दरसाल उत्पन्न ६ लाख होते. त्यांनी चांगल्या रीतीने आपल्या जहागिरीचा कारभार चालविला. जगदीशपूरात त्यांनी एक तलाव बांधला. जंगलांचा विकास केला. आरा येथे एक बाजार बांधला. सध्याही तो बाजार ‘बाबू बाजार’ म्हणून ओळखला जातो. सन १८४५ व १८५२ मध्ये बिहारमधल्या काही जमीनदारांनी इंग्रज सरकारविरूद्ध उठाव केले. पण त्यांत कुँवरसिंहानी भागा घेतला नाही. १८५७ साल उगवले व नानासाहेबांचे साधुवेषातले व फकिरांच्या वेषातले दूत देशभर क्रांतिच्या ज्वाला गुप्तपणे पसरवू लागले. तेव्हापासून कुँवरसिंहाचा व नानासाहेबांचा पत्रव्यवहार सुरु झाला. परिणामतः कुँवरसिंहांनीही १८५७ क्रांतीयुद्धात उडी घेण्याचे ठरविले. त्यांना त्यांचा लहान भाऊ अमरसिंह याने चांगली साथ दिली.
पाटणा हे वहाबी पंथीय मुसलमानांचे प्रमुख केंद्र होते. कंपनी सरकारच्या विरूद्ध त्यांनी पाटणा येथे गुप्त संघटना उभारली होती. वहाबी मुसलमानांनी कंपनी सरकारविरूद्ध उठाव केला. पीरअलीसह ४३ वहाबींना इंग्रजांनी कैद केले. परिअली व शेख घसीटा यांना फाशी देण्यात आले. पाच जणांना आजीवन कारावासाच्या शिक्षा दिल्या. बाकीच्यांना फटके मारून सोडून देण्यात आले.

पीरअलीच्या फाशीची बातमी ऐकताच दानापूर छावणीतील देशी शिपायांनी इंग्रज सरकारविरूद्ध विद्रोह सुरू केला. त्या सैनिकांनी आपले गणवेश फाडून फेकून दिले व ते जगदीशपूरकडे निघाले. कुँवरसिंहाचे दीवाण हरकिशन सिंह यांनी त्या शिपायांना उत्तेजन दिले. दानापूरचे सारे विद्रोही शिपाई आरा येथे आले. त्यांचे स्वागत हरकिशनसिंह व रणदलसिंह यांनी केले. कुँवरसिंहांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारले. हरिद्वारच्या मेळ्यात अनेक हिंदु मुसलमान राजे रजवाडे एकत्र जमले होते. त्यात कुँवरसिंह सुद्धा होते. तेथे सर्वांनी एकमताने निर्णय घेतला की, बिहारमध्ये इंग्रजाविरूद्ध संघटन बाबू कुँवरसिंह यांनी करावे व सर्वांनी त्यांना साथ द्यावी. दानापूर येथील विद्रोही सैनिकांनी कुँवरसिंहांना सांगितले की, ‘आपण आमचे राजे आहांत, सेनापती आहात, आपण राजपूत वंशाचे सूर्य आहात. तरी लवकर युद्ध सुरू करावे.”कुँवरसिंहांनी त्यांना आरा नगरला वेढा देण्यासाठी उद्युक्त केले. त्या सैनिकांनी इंग्रज सरकारचा खजिना लुटला. त्यांच्या कचेऱ्या जाळून टाकल्या. तुरुंग फोडून कैद्यांना मुक्त केले. नंतर त्यांनी आराच्या किल्ल्याला वेढा दिला. किल्ल्यात २५ इंग्रज सैनिक व ५० शीख सैनिक होते.तीन दिवस वेढा चालू होता. दानापूरहून मेजर डन्वर २७० इंग्रज सैनिक आणि १०० शिख सैनिक घेऊन आरा येथे आला. कुँवरसिंहाचे सैन्य जवळच्या आमराईत खंदक खोदून त्यात लपून बसले होते. डन्वर किल्ल्याजवळ येताच त्यांनी त्याच्या सैन्यावर चहूकडून गोळीबार सुरू केला. तुंबळ युद्ध झाले. त्यात मेजर डन्वर मारला गेला. आता संपूर्ण शाहाबाद जिल्हा कुँवरसिंहांच्या ताब्यात आला. त्यांनी स्वतःला शाहाबादचा राजा म्हणून घोषीत केले. शेख आह्याला मॅजिस्ट्रेट बनविले. शेख मुहम्मद अजीमुद्दीनला जमादार आणि त्याच्या हाताखाली तरब अली आणि कादिम अलीला कोतवाल म्हणून नियुक्त केले. हरकिशनसिंहाला प्रधान केले. थोडे दिवसच कुँवरसिंहाचा अधिकार शाहाबाद जिल्ह्यावर राहिला.
मेजर आयर अफगाणिस्तानवर विजय मिळवून बक्सरला आला. त्याला समजले की, कुँवरसिंहाने इंग्रज सैन्याचा पाडाव करून आरा आपल्या ताब्यात घेतले आहे. बिबिगंज येथे २ ऑगस्ट १८५७ रोजी दोन्ही सैन्यात घनघोर युद्ध झाले. त्यात कुँवरसिंहांचा पराभव झाला. कारण आयरच्या सैन्याजवळ तीन चांगल्या तोफा व नव्या बंदुका होत्या. त्यानंतर कुँवरसिंह जगदीशपूरला निघून गेले व त्यांनी पुन्हा सैन्य संघटन सुरू केले. आयरने आता जगदीशपूरकडे धाव घेतली. जगदीशपूरवर त्याने हल्ला करून ते जिंकले. कुँवरसिंह आपल्या सैन्यासह जगदीशपूरमधून निघून गेले. १४ ऑगस्ट १८५७ रोजी इंग्रज सैनिकांनी जगदीशपूर लुटले. स्त्री पुरूषांवर अत्याचार केले. कित्येक निरपराध लोकांची कत्तल केली. तेथले शिवमंदीर जमीनदोस्त करून टाकले.

कुँवरसह रोहतास, जवळच्या अकबरपूरला व नंतर रेवा येथे गेले. रेवाचा राजा इंग्रजांचा लाचार होता. त्याने कुँवरसिंहांना साथ दिली नाही. सप्टेंबर १८५७ मध्ये त्यांच्याजवळ फक्त ५०० सैनिक होते. नंतर त्यांनी बांदा गाठले.तेथले १५०० सैनिक आपल्याकडे वळवून घेऊन ते काल्पीकडे गेल. कुँवरसिंहाना पकडून देणारास इंग्रज सरकारने २५ हजार रुपयांचे इनाम जाहीर केले. पण त्याला कोणीही भीक घातली नाही.

कुँवरसिंह, अमरसिंह, किशनसिंग व रणदलसिंह काल्पीकडून सासाराम व कैसूर डोंगर दऱ्यात आले. त्या डोंगरदऱ्यात त्यांनी इंग्रज सैन्याला जेरीस आणले. २२ मार्च १८५८ रोजी कुँवरसिंहाच्या व कर्नल मिलमॅन यांच्या सैन्यात आझमगडजवळ घनधोर युद्ध झाले. मिलमॅनला पळ काढावा लागला आणि कुँवरसिंहांनी आझमगडावर आपली विजयपताका फडकविली.

[irp]

मिलमॅन गाझीपूर व बनारसकडे पळाला. त्याला बनारस येथे कॅ. डेम्स आपल्या सैनिकी तुकड्यांसह येऊन मिळाला. डेम्सच्या नेतृत्वाखाली त्यांनी आझमगडवरनिकराने हल्ला केला. पण कुँवरसिंहांच्या शूर सैनिकांनी त्याला पिटाळून लावले. आता कुँवरसिंहांकडे ५० हजार सैन्य होते. त्यांनी आपल्या सैन्याचे दोन विभाग केले. एका तुकडीकडे आझमगडच्या रक्षणाचे काम सोपवून ते दुसरी चांगल्या लढवयांची तुकडी घेऊन कुँवरसिंह बनारसवर चालून गेले. इलाहाबाद-कलकत्ता हा मार्ग अडविण्याचे त्यांचे धोरण होते. आता त्यांना अवधमधील विद्रोही सैनिक ही येऊन मिळाले.

लॉर्डकॅनिंगने निष्णात सेनापती लॉर्ड मार्ककर याला ५०० इंग्रज सैनिक, देशी पायदळ व आठ तोफा घेऊने आझमगडवर आक्रमण करण्यास पाठविले. आझमगडपासून आठ मैलावर ६ मार्च १८५८ रोजी तेथे दोन्ही सैन्यात घनघोर युध्द झाले. बनारस कडून कुँवरसिंह ही आपले सैन्यासह धावून आले. इंग्रजांकडे लांब पल्ल्याच्या तोफा असल्यामुळे आझमगडच्या सैन्याचा टिकाव लागला नाही. त्या सैन्याने इंग्रज सैन्याची पिछाडी गाठून इंग्रज सैन्यावर जोराचा हल्ला चढविला. मार्ककरने आझमगड गाठला. लखनौहून लुगार्ड आपल्या सैन्यासह मार्कच्या मदतीसाठी धावून आला मघाई येथे कुँवरसिंहाच्या थकलेल्या सैन्याला त्यांच्या सैन्याशी लढावे लागले. तानू नदीवरील पुलावर निवडक सैन्य ठेवून ‘आपण आझमगडावर हल्ला करण्यासाठी जात आहोत’, अशी हूल कुँवरसिंहांनी उठविली व ते आपल्या मुख्य सैनिक तुकडीसह जगदीशपूरकडे निघाले. तानू नदीच्या पुलावरील सैन्याने लुगार्डच्या सैन्याला तेथेच थोपवून धरले.

[irp]

कुँवरसिंहाला जगदीशपूरकडे जातांना कॅ. डग्लसने आपल्या सैन्यासह गाठले. कुँवरसिंह बालियाकडे गेले, असे समजताच डग्लसने तिकडे धाव घेतली. पण ती हूल होती. इकडे बलियापासून सात मैलावरील घाटावरून कुँवरसिंह आपल्या सर्व सैन्यासह गंगापार झाले. गंगापार होताच आपण आता निर्विघ्न झालो, अशा समजुतीने कुँवरसिंहाच्या सैनिकांनी त्यांची गंगापार होताच जंगी मिरवणूक काढली. कुँवरसिंह, अमरसिंह, हरकिशनसिंह व रणदलसिंह सजविलेल्या हत्तीवरुन चालले होते. कॅ. डग्लस त्यांच्या जवळ येऊन ठेपला होता. गंगेच्या अलीकडील तीरावरुन त्याने लांब पल्ल्याच्या तोफेतून नेम धरुन कुँवरसिंहावर तोफेचा गोळा सोडला. तो गोळा कुँवरसिंहाच्या डाव्या हाताला चाटून गेला व पलीकडे असलेल्या रणदलसिंहाचा प्राणही घेऊन गेला. कुँवरसिंह हत्तीवरुन खाली कोसळले. सावध होताच त्यांनी आपल्या उजव्या हातात तलवार घेऊन आपला डावा हात तोडला व गंगेला अर्पण केला. त्यांच्या डाव्या हाताला वनौषधी लावून पट्ट्या बांधण्यात आल्या व ते सैन्य त्यांना घेऊन जगदीशपूरकडे धावत निघाले. जगदीशपूर आता उजाड झाले होते, पण कुँवरसिंहाचा ध्वज महाद्वारावर फडकत होता.कुँवरसिंहाना एका झोपडीत ठेवण्यात आले. त्यांना ताप चढू लागला. त्यांचे सहकारी दुःखाने तळमळत होते. उपचार चालूच होते. दोन दिवसांच्या उपचारांनी फरक पडला नाही. अखेर २४ मे १९५८ रोजी या महान क्रांतिकाराने आपल्या फडकत असलेल्या ध्वजाकडे पाहात आपल्या मातृभूमीचा निरोप घेतला. ८० वर्षाचा हा वृद्ध तरुण मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी तुफान वेगाने मध्य भारताच्या पूर्व भागात मी मी म्हणणाऱ्या इंग्रज सेनाधिकाऱ्यांना जुलै १८५७ ते मे १८५८ च्या दहा महिनेपर्यंत धडका देत होता व त्याने कंपनी सरकारच्या तोंडचे पाणी पळविले होते. धन्य तो वीर! धन्य त्याचा देशाभिमान! धन्य त्याचे रणनैपुण्य!

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!