Home Study Material कुँवर सरजू प्रसाद

कुँवर सरजू प्रसाद

एकोणवीसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात विंध्य पर्वताच्या पूर्वेकडील भागात कुशवाहा राजवंशाचे राज्य होते. त्याला मैहर रियासत म्हणत असत. सन १८२६ मध्ये भाऊबंदुकीमुळे या राज्याच्या वाटण्या झाल्या. त्यात छोटा कुँवर प्रगदास सिंह याच्या वाट्याला विजयराघवडाचे राज्य आले. जबलपूर जिल्ह्याचे ईशान्य दिशेस विजयराघवगडचा किल्ला आहे. विंध्य पर्वताच्या पूर्वेकडील भागात दूरवर पसरलेल्या मैदानातून पाच किलोमीटर अंतरावरून एक लहानशी नदी वाहते. त्या नदीच्या काठी विजयराघवगडहा भक्कम किल्ला होता. हा किल्लाच कुँवर प्रागदाससिंहाची राजधानी होती. प्रागदाससिंहांनी फक्त १५/१६ वर्षेच राज्य केले. सन १८४२ मध्ये बुंदेलखंडातील राजानी इंग्रज सरकारविरुद्ध बंड केले होते. त्यात प्रागदाससिंहांचा सहभाग असल्यामुळे इंग्रज सरकार त्यांच्यावर नाराज झाले. म्हणून सन १८४८ मध्ये इंग्रज सरकारने विजयराघवगडच्या राज्यात आपला हस्तक सादिकअली याला मॅनेजर म्हणून नेमले. प्रागदाससिंहांच्या पुढे त्याच्या सर्व कारवाया असफल होत गेल्या.
सन १८५६ मध्ये प्रागदाससिंहांचे निधन झाले आणि सादिकअलीचे फावले. प्रागदाससिंहाचे एकुलता एक पूत्र कुँवर सरजू प्रसाद १७/१८ वर्षांचा असतांना प्रागदाससिंहांनंतर विजयराघवगडच्या गादीवर आला. त्याचे लहान वय पाहून सादिकअली राज्यकारभारात हस्तक्षेप करू लागला. फायदा उठवू लागला. त्याच्या अशा हस्तक्षेपाने जनतेतही त्याच्याविषयी असंतोष निर्माण झाला. त्याची मनमानी चालूच होती. तशात १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध सुरु झाले. कुँवर सरजू प्रसादही त्या युद्धात सामील झाला. आपल्या राज्यातील लोकांचे नेतृत्व ह्या स्वातंत्र्य युद्धात केले. विजयराघगडच्या जनतेने सर्वात आधी इंग्रजांच्या हस्तक असलेल्या कारस्थानी सादिकअलीचा काटा काढला. सरजूप्रसाद विरूद्ध तो सतत कारस्थाने करीत असायचा. त्याचे फळ त्याने भोगले.

सरजू प्रसादच्या नेतृत्वाखाली विजयराघवगडमधील तीन हजार सैनिक इंग्रज सरकारविरुद्ध बंड करून उठले. जबलपूर-मिर्जापूर मार्ग त्या काळात उत्तर-दक्षिण भारतातील वाहतुकीचा प्रमुख मार्ग होता. तो मार्ग त्यावर तोफा सज्ज ठेवून या सैनीकांनी बंद करून टाकला व इंग्रजांच्या सैन्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे येणे दुरापास्त करून टाकले. ते समजताच जबलपूरच्या कमिशनरने गोऱ्या सैन्याची एक तुकडी तो मार्ग मोकळा करण्यासाठी पाठविली. पण सरजूप्रसादच्या सैन्याने त्या गोऱ्या सैन्याला पळता भुई थोडी करून सोडली.

अखेर एका फितुराने इंग्रज सैन्याला मार्गदर्शन केले. त्यामुळे ते सैन्य विजयराघवगडापर्यंत पोचू शकले. इंग्रज सैन्याने तोफा डागून विजयराघवगडाच्या तटाला खिंडारे पाडली. व त्या खिंडारातून इंग्रज सैन्य गडात शिरले. सरजूप्रसाद मात्र गुप्तपणे गडातून निसटून जाण्यात सफल झाला. इंग्रजांनी त्या गडातील इमारती तोफा डागून पाडून टाकल्या. गडात भयंकर लुटमार केली. आज त्या गडाचे फक्त भग्नावशेष शिल्लक आहेत.

[irp]

कुँवर सरजू प्रसाद फरारी अवस्थेत सलग बारा वर्षे देशाच्या वेगवेगळ्या भागात हिंडत राहिला. इंग्रज अधिकारी त्याला पकडू शकले नाहीत. म्हणून त्यांनी फितुरीच्या मार्गाने सरजूप्रसादला फकडण्याचा डाव टाकला. ते अधिकारी सरजूप्रसादच्या मेहर भाऊबंदाना भेटले. बाण बरोबर लागला. भाऊबंदकीने डाव साधला. इंग्रज सरकारची कृपा सरजूप्रसादला पकडून दिल्यानंतर त्यांना लाभणार होती. त्यांनी सरजूप्रसादचा तपास करून इंग्रज अधिकाऱ्यांना त्याचा पत्ता सांगितला. त्यामुळे सरजूप्रसाद पकडला गेला.
सरजूप्रसादला कैद करून त्याला कलकत्ता येथे आगगाडीतून नेण्यात येत होते. आपणास कलकत्याला नेऊन आमरण काळ्या पाण्यावर पाठविण्याचा इंग्रजांचा हेतू त्याने ओळखला. बंदीवासात कुजून मरण्यापेक्षा स्वतंत्र होऊन मरण पत्करणे, हेच श्रेयस्कर आहे, असे त्याने ठरविले. गाडी वाराणसीच्या पुढे निघाली आणि बरोबर असलेले पहारेकरी सैनिक पेंगाळले असता, सरजूप्रसादने धावत्या गाडीतून खाली उडी घेतली. त्यानंतर सरजूप्रसादचे काय झाले, हे एकट्या परमेश्वरालाच माहीत! तो पुन्हा इंग्रजांच्या हाती लागला नाही, एवढे मात्र खरे.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!