Home Study Material काजीसिंग नाईक

काजीसिंग नाईक

भिल्ल ही डोंगर-दऱ्यांत, जंगलात रहाणारी आदिवासी जमात. इतिहास काळात निरनिराळ्या राजांच्या पदरी रक्षकाचे काम या जमातीच्या लोकांनी केले होते. शिवाजी महाराजांनीही गडकोटांच्या रक्षणासाठी अनेक भिल्लांची नेमणूक केली होती. नेहमीच जंगलात यांचे वास्तव असल्याने या जमातीचे लोक धाडसी, काटक व बलदंड असत. तसेच ते शूरही होते. कंपनी सरकारनेही या जमातीचे काही लोक आपल्या सैन्यात घेतले होते.
काजीसिंग नाईक हा कंपनी सरकारकडे सन १८३१ ते १८५१ पर्यंत नोकरीस होता.सिध्वा ते शिरपूर या ४० मैलांच्या जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरील भिल्ल पोलीसांवर देखरेख करण्याचे काम त्याने २० वर्षे इमाने-इतबारे चोखपणे बजावले होते. त्याच्या नोकरीच्या काळात या रस्त्यावर चोरी किंवा खून अथवा लूटमार कधीही झाली नव्हती. दरोडेखोरांचा पाठलाग करण्यात त्याने अनेक इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांला बहुमोल साहाय्य दिले होते. सन १८५१ मध्ये या रस्त्यावर चोरी करणाऱ्या दरोडेखोरांनी पकडले व त्याला खूप मारले. चुकून एक घाव वर्मी बसला व तो दरोडेखोर मरण पावला. काजीसिंग खुनी ठरला. त्याला सरकारने १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली व तुरुंगात डांबले. नंतर त्याच्या मागच्या २० वर्षाच्या सेवेचा विचार करून सन १८५५ मध्ये कैदेतून मुक्त केले.

काजीसिंगाने पुन्हा आपणास नोकरी द्यावी, म्हणून खूप प्रयत्न केले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मे १८५७ मध्ये उत्तर हिंदुस्थानातून बंडाच्या बातम्या दक्षिणेकडे येऊ लागल्या. मुंबईचा गव्हर्नर व त्याचे इंग्रज अधिकारी ते बंड आपल्या प्रदेशात पसरू नये, म्हणून दक्षतेचे उपाय योजू लागले. भिल्ल लोकही उठाव करतील व सोरापूर सिध्वा मार्ग सुरक्षित राहणार नाही, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यासाठी काजीसिंगाला त्याच्या पूर्वीच्या नोकरीत घेणे इंग्रज सरकारला अत्यावश्यक वाटले. आणि जून १८५७ मध्ये त्याला सरकारने नोकरी दिली. त्यालाही उत्तरेकडे इंग्रज सरकारविरुद्ध देशी पलटणी, अनेक राजे लढत असून इंग्रज सरकाराचा पराभव होत आहे अशा बातम्या समजल्या होत्या. इंग्रजांची सत्ता आता संपत आली आहे, असे त्याला वाटू लागले.
भिल्लांनाही इंग्रज सरकारविरुद्ध उठाव करावा, असे त्याला उत्तरेकडून निरोप आला. आता आपणांस आपला पूर्वापार चालत आलेला लुटमारीचा उद्योग करावा लागणार, असे त्याच्या मनाने घेतले. तो त्या नोकरीवर असताना एके प्रसंगी कॅप्टनबर्च व त्याचा रिसालदार यांच्याकडून शिव्या खाव्या लागल्या व तो मनातून पेटून उठला. त्याने सरकारच्या त्या नोकरीवर लाथ मारली आणि आपली माणसे संघटीत केली. इंग्रज सरकारची ठाणी लुटण्याचे सत्र सुरु केले.

होळकर सरकारच्या सैन्यातून काढून टाकलेले सैनिक, झांशीच्या युद्धात पराभूत झालेले शिपाई दक्षिणेकडे सातपुड्यात आश्रयाला आले. ही तर भिल्लभूमीच होती. ते सैनिक काजीसिंगला येऊन मिळाले. त्याचे बळ वाढले. गावोगावच्या जमीनदारांच्या, सावकरांच्या घरांवर धाडी घालणे, अफूच्या गाड्या लुटणे, सरकारी खजिने हस्तगत करणे यांचा धूमधडाका काजीसिंगाने सुरु केला.

[irp]

सप्टेंबर १८५७ मध्ये सातपुड्याच्या पूर्व भागातील भीमा नाईकाने आपल्या भिल्ल सहकाऱ्यांसह लेफ्ट.केनेडी याच्या तुकडीवर निकाराचा हल्ला चढवून त्याला पळवून लावले. त्याने खानदेशाच्या पोलीस अधिकाऱ्यांना दम भरला की, तुम्ही इंग्रज सरकारला साथ देत आहोत, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. मी दिल्लीच्या बादशहाच्या हुकुमावरून तुम्हाला बाजावून ठेवतो. या भीमा नाईकाला पडकडण्यासाठी इंग्रज सरकारने एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर तो काजीसिंगाला आपल्या सहकाऱ्यांसह येऊन मिळाला. २९ ऑक्टोबर १८५७ रोजी काजीसिंगाने भीमा नाईकासह दीड हजार भिल्ल जमवून शिरपूर लुटले. त्यांच्या पाठलाग कॅप्टन बर्चने ५६ मैलापर्यंत केला. पण ते साहे घनदाट आरण्यात निघून गेल्याने निराश होऊन बर्चला हात हालवीत परत जावे लागले. त्यानंतर काजीसिंग व भीमाने खानदेशातील तीन गावे लागोलग लुटली.

सिन्नर भागातून ४०० भिल्ल त्यांना सामील होण्यासाठी येत आहेत, अशी बातमी जिल्हाधिकाऱ्याला लागल्यावर त्याने खानदेशात अधिक कुमक पाठविण्यास सरकारला कळविले. ती कुमक येण्याआधीच काजीसिंग व भीमा यांनी सिध्वा घाटात सात लाखांच्या सरकारी खजिना लुटला. लुटीत सामील झालेल्या शेकडो भिल्लांची चंगळ झाली. त्या लुटीत त्या खजिन्याच्या रक्षकांनीही हात धुवून घेतला. त्यानंतर त्यांनी अफूने भरलेल्या ६० बैलगाड्या लुटल्या. सरकारी पोस्ट लुटले. टेलिग्राफच्या ताराही तोडून टाकल्या.त्यानंतर त्यांना धारच्या फौजेतून मुक्त झालेले दोन हजार विलायती पठाण येऊन मिळाले.

[irp]

भिल्लांच्या उपद्रव सारखा वाढत चालल्याचे पाहून इंग्रज सरकारच्या पलटणी त्यांचा बीमोड करण्यासाठी जंग जंग पछाडत होत्या. मेजर इव्हान्सने काजीसिंग, भीमा, दौलतसिंग यांच्या भिल्लांच्या मोठ्या जमावावर निकाराचा हल्ला चढविला. इव्हान्सच्यासेनेला भिल्लांनी चोपून मार दिला. अंबापाणीच्या या लढाईत कॅ. बर्च, लेफ्ट. बेसवी हे जखमी झाले. ६५ भिल्ल कामी आले व १७० भिल्ल जखमी झाले. ११ एप्रिल १८५८ ची ही लढाई इंग्रजांना फार महाग पडली. त्यांचे ही कित्येक शिपाई ठार झाले. कित्येक जखमी झाले. हार खावी लागली, ती वेगळीच. या लढाईत मात्र ६२ भिल्ल पकडले गेले. त्यापैकी ५७ जणांना गोळ्या घालून मारण्यात आले. भिल्ल इतक्याच त्यांच्या बायकाही धोकादायक आहेत, हे इंग्रज सरकारला कळून आले, तेव्हा ४०० भिल्लीणींना सरकारने पकडून ओलीस ठेवले. काजीसिंग, भीमा इ. भिल्लांचे नेते सापडेपर्यंत सरकारने त्यांना पकडून ठेवले होते. याचा बदला नगर जिल्हातील भिल्लांनी घेतला.

नगर जिल्ह्यातले ४०० भिल्ल नांदगांव जवळच्या जंगलात एकत्र जमले. ते समजताच लेफ्ट. स्टुअर्ड ३०० सैनिकांसह नांदगांवला आला. नदीकाठच्या दाट जंगलातून भिल्लांनी त्या सैनिकावर जबरदस्त मारा केला. त्यांच्या माऱ्यात कॅ. माँटगोमेरी, लॅफ्ट. स्टुअर्ट, लेफ्ट. चेंबरलेन व कॅ. डॉक्सिन जखमी झाले. १९ सैनिक ठार झाले. ५० सैनिक जखमी झाले. २५ भिल्ल मरण पावले. लेफ्ट. स्टुअर्ड २१ एप्रिल १८५८ रोजी दवाखान्यात मरण पावला. त्यानंतर ही सातपुड्यात भिल्लांच्या इंग्रज सैन्याशी वर्षभर चकमकी सुरुच होत्या.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!