Home Study Material उमाजी नाईक

उमाजी नाईक

महाराष्ट्रात रामोशी ही जमात पूर्वापारपासून कायमची रहिवासी होती. सह्याद्रीची डोंगरदऱ्यांत एकोणवीसाव्या शतकात त्यांची लोकसंख्या १७ ते १८ हजार होती. रामोशी लोक स्वतःला ‘रामवंशी’ म्हणायचे. लोक त्यांना ‘रानवसी’ म्हणजे रानावनात राहणारे असेही म्हणत असत. ही जमात अतिशय बलदंड, धाडसी, शूर, विश्वासू, प्रसंगी प्राणांची पर्वा न करता लढवणारी म्हणून प्रसिद्ध होती. छत्र. शिवरायांनी या धाडसी व पराक्रमी लोकांची नेमणूक गडकिल्ल्यांचे व गडकिल्ल्यांच्या घेयांचे रखवालदार म्हणून केलेली होती. त्याबद्दल छत्रपतींनी त्यांना वतने (म्हणजे काही चाहूर जमीन – एक चाहूर म्हणजे १५ बिघे) त्यांच्या योग्यतेनुसार वंशपरंपरागत दिलेली होती. त्यांना ‘नाईक’ ही पदवी छत्रपतींनीच दिली होती. त्यांना त्या वतनांचे दस्तऐवज वा ताम्रपटही दिलेले होते. रखवालदाराबरोबर ते आपली शेती ही करायचे शेळ्यामेंढ्या पाळायचे. दुष्काळ पडला की त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत असत. म्हणून हे लोक दरोडेखोरीही करायचे, दरोडे घालण्यासाठी त्यांना जहागीरदार, वतनदार, जमीनदार आदि धनिकांच्या पाठिंबा असायचा. दरोडेखोरांना असा पाठिंबा स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत या धनाढ्य वर्गाकडून मिळत असे. दरोड्यात मिळालेल्या मालापैकी मोठा वाटा हे धनाढ्य लोक घेत असत व त्यातला थोडासा भाग दरोडेखोरांना देत असत. या दरोडेखोरीच्या उद्योगामुळे रामोशी म्हणजे दरोडे खोर असाच अर्थ जनता समजत असे. या रामोशांप्रमाणे कोळी लोकही गड किल्ल्यांची राखणदारी व दरोडेखोरी करीत असत.

पेशवाईच्या अखेरच्या काळात मोठमोठे सरदार, जहागीरदारही लुटालूट करायचे. पण या बड्या लोकांना दरोडेखोर म्हणायची हिंमत कोण करणार? त्या काळात सर्वत्र अंधाधुंदी माजली होती.
उमाजी हा रामोशी होता. त्याचा जन्म पुण्यापासून सुमारे २५ कि.मी. वर आणि पुरंदर गडापासून ईशान्येस सुमारे तीनसाडेतीन कि.मी. अंतरावरील भिवडी या गावी इ.स. १७९१ मध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव दादजी खोमणे. दादजी महापराक्रमी होता. पुरंदर किल्ल्याच्या रखवालदारीचे त्याचे वतन पुरंदर किल्ल्याच्या परिसरातच होते. त्याने आपल्या आयुष्यात ११० दरोडे घातले होते. वार्धक्याने तो इ.स. १८०२ मध्ये वारला त्यावेळी उमाजीचे वय अवघे ११ वर्षांचे होते. तो वर्णाने गोरा-लालसर, मध्यम उंचीचा होता. अंगाने सुदृढ, मोठे डोळे व चेहरा नेहमी प्रसन्न व सौम्य असा तो होता. दादजीची वतनदारी वंशपरंपरेने त्याच्याकडे आली होती.

सन १८०२ मध्ये वसईचा तह इंग्रजांशी करुन दुसरा बाजीराव त्यांच्या हातातले बाहुले बनला व त्याने इंग्रजांच्या सल्ल्यावरुन रामोशांची वतने काढून घेतली. उमाजी नाईकादि काही रामोशांनी बाजीरावाला विरोध केल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात राहणे असुरक्षित वाटू लागले व उमाजीसह ते सन १८१४ मध्ये निजाम हद्दीत परांड्याला गेले. परांड्याच्या मुसलमान किल्लेदाराला दोन बायका होत्या.धाकट्या बायकोने आपल्या सवतीच्या (मोठीचा) खून करण्यास उमाजीला व त्याच्या साथीदारांना सांगितले. तेव्हा त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितले की, “खून करण्याची कामे आम्ही करीत नाही.”तेव्हा तिने संतापून आपल्या शिपायांकरवी सर्व रामोशांना तुरुंगात टाकले. निजामहद्दीत ही राहणे धोक्याचे आहे, असा विचार करुन त्यांनी तुरुंगातून आपली सुटका करुन घेतली व रातोरात निजामाची हद्द ओलांडून ते सारे पुण्याकडे आपपल्या मूळ गावी आले. ते साल १८१६ होते. वतनदारी गेली. शेतीही गेली. केवळ शेळ्या मेंढ्या पाळून जगणे अशक्य होते. म्हणून पुन्हा एकदा बाजीरावाकडे वतने मागण्यासाठी उमाजीसह सगळे रामोशी गेले. त्याच्या खूप विनवण्या केल्या. पण बाजीरावाने वतने परत दिली नाहीत. उमाजी अत्यंत निराश झाला. दारुच्या आहारी गेला. एकदा तो व त्याचा पुतण्या दारुच्या नशेत एकमेकांशी खूप भांडले. पुतण्याने उमाजीच्या डोक्यात धोंडा घातला. उमाजीला मोठी जखम झाली व भळभळा रक्त वाहू लागले. तेव्हा दारुमुळे आपल्या हातून चुका होतात, हे जाणून उमाजीने दारु कायमची सोडून दिली. यावरुन हे दिसून येते की, उमाजी पक्क्या निर्धाराचा होता.
सन १८१८ मध्ये इंग्रजांनी पेशवाई बुडविली. दुसऱ्या बाजीरावाला दरसाल ८ लाख रुपये पेन्शन देऊन उत्तरेत गंगाकिनारी ब्रह्मवर्तास नेऊन ठेवले व सगळा कारभार इंग्रजांनी आपल्या हातात घेतला. त्यावेळी इंग्रजांनी एक जाहीरनामा काढला. त्यात त्यांनी नमूद केले होते की, “ज्याच्या त्याच्या जहागिऱ्या, वतने ज्याला त्याला मिळतील; लहान मोठ्या वतनदारांना व जहागीरदारांना त्यांच्या जहागिऱ्या व वतने मिळाली; पण या गरीब रामोशांना त्याची वतने परत दिली नाहीत. तेव्हा पुन्हा उमाजीसह सर्व रामोशांनी इंग्रज सरकारने आपल्या वतनांची मागणी केली. पण इंग्रज सरकारनेही त्यांना दाद दिली नाही. हे लक्षात घेऊन उमाजीने इंग्रज सरकार विरुद्ध उठाव करायचे ठरविले.

___ उमाजी उत्तम संघटक होता. बरेचसे रामोशी त्याला आपला नेते मानू लागले. उमाजी आता भर जवानीत होता. शरीराने अतिशय बळकट, भरदार छाती, पिळदार दंड, अंगात अमाप ताकद, गोरा लालसर वर्ण, सदा प्रसन्न मुख, अत्यंत धाडसी व शूर असा हा उमाजी सगळ्या रामोशांना हवाहवासा वाटू लागला. ते त्याच्या पाठीशी एकदिलाने उभे राहिले. त्याने गोर गरीबांना लुटणारे सावकार, वतनदार व जमीनदार यांना त्याने आपले लक्ष बनविले. हे सारे इंग्रजांच्या कृपाछत्राखाली ऐषारामात जगत होते. उमाजी एक पत्नीव्रती होता. त्याने आपल्या साथीदारांना बजावले, दरोडा घालतांना कोणाही बाईच्या वा मुलाच्या अंगाला हात लावायचा नाही. सगळ्या स्त्रिया आपल्या आयाबहिणी समान आहेत. आणि त्याने आपल्या साथीदारांसह मोठमोठे दरोडे घालण्यास सुरुवात केली. एक वर्षी तर त्याने कहरच केला. त्याने वीस बावीस मोठमोठे दरोडे घातले. सातआठ वेळा रस्ते लुटले. दरोड्यात व लुटीत मिळालेली रक्कम त्याने आपल्या साथीदारांना वाटून टाकली. काही रक्कम गोरगरीबांना दान दिली. जेजुरीचा खंडोबा व कन्हेपठार हे तर त्यांचे कुलदैवतच होते. त्या देवस्थानांना व त्यांच्या पुजाऱ्यांना दाने दिली. त्यामुळे जनतेत त्याची लोकप्रियता वाढली. उमाजीचा पाठलाग इंग्रज सरकारचे सेनाधिकारी करु लागले. त्याच्यावर हेर सोडले पण कोठेच त्याचा पत्ता लागत नव्हता. लोक माहीत असूनही त्याचा ठावठिकाणा सांगत नव्हते.
मुंबईच्या चानजी मातिया या पेढीवाल्याचा माल उमाजीने पनवेल गावाजवळील खालापूर जवळ धाड घालून पळविला. तेव्हा उमाजी इंग्रजांच्या हाती लागला. त्याला फटक्यांची व एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यावर एका दरोड्यात तो पुन्हा पकडला गेला. त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगातील रिकामा वेळ चांगल्या कामासाठी घालविण्यासाठी त्याने तुरुंगाधिकाऱ्याजवळ लिहायला – वाचायला शिकण्याची इच्छा व्यक्त केली. एक खालच्या जातीतला दरोडेखोर लिहिणे – वाचणे शिकू पाहतो, हे ऐकून इंग्रज अधिकारी मार्किंटाश तर चकितच झाला. त्याने उमाजीच्या शिकण्याची व्यवस्था केली. तो काही महिन्यातच लिहायला वाचायला शिकला.

सासवडचा सत्तू रामोशी आपल्या टोळीसह पुण्याच्या आसपास दरोडे घालीत असे. तुरुंगातून उमाजी आपल्या टोळीसह त्याला जाऊन मिळाला. आता सत्तूच्या नेतृत्वाखाली दरोडे घालण्याचे काम सुरु झाले.

सन १८२१ साली एका दरोड्यात सत्तकडून चुकून एका महाराणीचा खून झाला. इंग्रज शिपायांनी त्याला पकडून पुण्याकडे चालविले. हे समजताच उमाजीने आपल्या टोळीसह दिवे घाटात त्या शिपायांकडून सत्तूला सोडवून आणले. सन १८२३ मध्ये जेजुरीच्या यात्रेत उमाजीच्या अमृता या भावाला चोरी करतांना तेथल्या पोलिस पाटलाने पकडले. अण्णाजी नाईक हा तो पाटील होता. अण्णांजी नाईक धिप्पाड व बलदंड होता. उमाजीने आपल्या भावास सोडून द्यावे, म्हणून अण्णाजीच्या खूप विनवण्या केल्या. पण अण्णाजी अमृताला सोडतच नव्हता. तेव्हा उमाजीने आपली तलवार उपसून भर यात्रेत अण्णाजी पाटलाची खांडोळी केली व अमृतासह तो पसार झाला. तेव्हापासून लोक उमाजीला चळचळा कापू लागले.
उमाजीने इंग्रजांच्या पोलिस खात्यातील एक अधिकारी राजे महंमत सुभेदार याला गुपचूप आपल्याकडे वळवून घेतले होते. म्हणूनच उमाजीने पुण्यात व आसपासच्या गावात सात-आठ दरोडे घातले. पाच-सहा ठिकाणी रस्ते लुटले. पण तो इंग्रजांच्या हाती सापडू शकला नाही. आता सत्तू आणि उमाजी यांनी मोठे धाडस करायचे ठरविले. इंग्रज सरकारचा खजिना भांबुडाला (सध्याचे शिवाजीनगर) एका भक्कम वाड्यात होता. २४ फेब्रुवारी १८२४ च्या रात्री त्यांनी त्या वाड्यावर धाड घालून पहाऱ्यांच्या शिपायांना जायबंदी केले व तो खजिना लुटला. त्या लुटीत सहा हजार दोनशे रुपये मिळाले. ती रक्कम सर्वांनी आपसात वाटून घेतली. उमाजी व त्याचा भाऊ कृष्णाजी यांनी आपल्या वाट्यातील बरीच रक्कम जेजुरीच्या खंडोबा देवस्थानला दान म्हणून दिली. या दरोड्यामुळे इंग्रज सरकार चांगलेच हबकून गेले. त्या वाड्यापासून थोड्याच अंतरावर इंग्रज कमिशनरचा बंगला होता, हे विशेष.

दुर्देव असे की, ऑगस्ट १८२४ मध्ये सत्तू कॉलऱ्याच्या साथीत मरण पावला. नंतर त्याच्या व उमाजीच्या टोळ्यांचे नेतृत्व उमाजीकडे आले. तेव्हापासून तो आत्मविश्वासाने वागू लागला. मिरज-पुणे रस्त्यावर त्याने सरदार पटवर्धनांचे लग्नाचे व-हाड अडविले व त्यांचेकडून दोन हजार रुपये मिळविले. फलटणच्या निंबाळकरांचा खजिना पुण्याकडे जात असतांना उमाजीने तो लुटला. या लुटीत त्याला आठ हजार रुपये मिळाले. पटवर्धन-निंबाळकरांसारख्या सरदारांनीही उमाजी लुटायला कचरत नाही, हे पाहून इंग्रज सरकार हबकून गेले. तेव्हा इंग्रज सरकारने उमाजी व त्याच्या साथीदारांना पकडून देणारांस बक्षीसे देण्याचा जाहीरनामा काढला.

सन १८२७ च्या उत्तरार्धात उमाजीचा दृष्टिकोन बदलला. त्यानुसार त्याने जाहीरनामा काढला, तो असा- “राज्य आपले आहे. इंग्रज उपरे व लुटारू आहेत. म्हणून प्रत्येक गावच्या पाटील-कुलकर्त्यांनी सारा वसुलीचा भरणा आमच्याकडेच करावा. त्यांनी भरणा न केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. अशा पाटीलकुलकर्यांना शिक्षा दिली जाईल व त्यांचे वाडे जाळले जातील. आमची बातमी इंग्रजांना देणारास अशीच जबर शिक्षा देण्यात येईल.” – उमाजी राजे-मुक्काम डोंगर.


 

इंग्रज सरकारला बातमी देणाऱ्या जागोजी पाटलांचा वाडा उमाजीने जाळून बेचिराख केल्याने गावोगावचे पाटील-कुलकर्णी चांगलेच हबकून गेले व उमाजीच्या लोकांना सारावसुलीचा भरणा देऊ लागले.- इंग्रज सरकारसमोर उमाजीने चांगलेच आव्हान उभे केले होते. त्यामुळे सरकार चवताळले.उमाजीला पकडून देणारास १२०० रुपयांचे बक्षीस सरकारने जाहीर केले. पण उमाजीचा थांगपत्ता सरकारला लागत नव्हता. आता बहुतेक पाटील कुलकर्णी उमाजीला गुप्तपणे साह्य करू लागले, लोकही त्याच्याकडे आशेने बघू लागले.साऱ्या जनतेचा तो कौतुकाचा विषय बनला होता. तो गरीबांचा वाली होता.

आता काट्यानेच काटा काढला पाहिजे या विचाराने सरकारने एकापाठोपाठ शिवनाक महार, बळवंत कोळी व राणोजी रामोशी यांना उमाजीला पकडण्याचा मोहिमेवर लावले. पण उमाजी त्यांना पुरून उरला. त्याने त्यांना चांगलीच अद्दल घडविली.

[irp]

सरकारने उमाजीचा भाऊ अमृता व विठोबा ब्राम्हण यांना पकडून कैदेत टाकले. तेव्हा उमाजीने रॉबर्टसन या इंग्रज अधिकाऱ्याला दि. ३०।११।१८२७ रोजी राजाच्या थाटात पत्र लिहिले, ते असे

“अमृता रामोशी व विठोबा ब्राम्हण यांना सोडून द्यावे व व्यवहाराची बोलणी करून संघर्ष मिटवावा. हा व्यवहार म्हणजे सर्व रामोशांची वतने ज्याची त्याला परत द्यावी. त्या वतनांत रामोशांनी पूर्ण मुखत्यारीने कारभार पाहावा. त्या वतनांचे दस्तऐवज व ताम्रपट आमचेकडे आहेत. कोणालाही धक्का लागू नये. तुम्ही जर हे मानले नाही, तर सातपुड्यापासून दक्षिण कोकणापर्यंत अशी हजारो बंडे उभी राहतील.” – उमाजी राजे मुक्काम डोंगर

उमाजीच्या या पत्राने चिडून जाऊन इंग्रज सरकारने नवा जाहीरनामा काढला.

“उमाजी, भुजाजी, पांडूजी येसाजी या बंडाच्या नेत्यांना पकडून देणाऱ्यांस प्रत्येकी पाच पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.”त्या बरोबरच कॅप्टन डेव्हिस या सेनाधिकाऱ्याची नेमणूक पुरेशा शिबंदीसह उमाजीला पकडण्याच्या मोहिमेवर सरकारने केली-इंग्रजांच्या पाच माणसांना ठार करून डिसेंबर १८२७ त्यांची मुंडकी एका खरमरीत पत्रांसह उमाजीने सासवडला सरकारी अधिकाऱ्यांकडे पाठविली.”आमची वतने आम्हांस परत द्या. नाहीतर पुढच्या परिणामांना तयार राहा.”असा दणकेबाज इशारा उमाजीने त्या पत्रात दिला होता.

[irp]

सन १८२७-२८ मध्ये उमाजीने कोल्हापूरचे छत्रपती व कुलाब्याचे आंग्रे वगैने संस्थानिकांशीही संधान बांधले होते. तो स्वतःला राजा म्हणवीत होता. पांगरीजवळच्या डोंगराच्या गुहेत एका दगडावर राजासारखा बसायचा आपला दरबार थाटात भरवायचा. लोक त्याच्या भेटीला यायचे. त्याला नजराणे, देणग्या द्यायचे. लोकांना तो दाने द्यायचा. दि. १५/१२/१८२७ च्या एका पत्रात एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहिले आहे“उमाजी व त्याचे लोक आता दरोडेखोर राहिले नव्हते. आता ते क्रांतिकारक बनले होते.”

उमाजीजवळ आता एक हजार लढवय्ये होते. त्यांत रामोशी, कोळी, कुणबी, परदेशी, मुसलमान, कैकाडी, मांग, मराठे, हेटकरी असे अनेक जातीचे लोक होते. त्यांना आता तो दरमहा वेतन देऊ लागला. त्यांच्या लहान लहान टोळ्या बनवून त्यांना छापामारी करण्याचे कसब त्याने शिकविले होते. देशावर सातारा, वाई, भोर पासून कोल्हापूर पर्यंत व कोकणातही त्या टोळ्यांनी धुमश्चक्री उडवून दिली.

इंग्रज सरकारने आता कॅन्डेव्हीस व कॅ-स्पिलर यांची नेमणूक उमाजीला व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी केली. त्यांच्यासोबत घोडदळही दिले. त्यांनी पुरंदरच्या पंचक्रोशीत १५२ चौक्या उभारल्या. पाटलांचे आतून साह्य असल्यामुळे उमाजीचे लोक त्या चौक्यांच्या जवळपासच्या गांवात धाडी घालून निर्धास्तपणे पसार होत होते. या दोन्ही अधिकाऱ्यांना उमाजीने जेरीस आणले. परंतु एवढ्या लोकांचे वेतन व खर्च सांभाळणे आता जड जाऊ लागले. पैसा कमी पडू लागला. तेव्हा त्याने नवाच डाव टाकला. भुजाजीमार्फत त्याने इंग्रज अधिकाऱ्यांशी संधान बांधले व समझोता केला. त्यात सर्व गुन्ह्यांची माफी त्याला देण्यात आली व त्यांना सरकारने जुलै १८२९ मध्ये नोकरीवर घेतले. आता उमाजीतर्फेच राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे सरकारने ठरविले. उमाजीला साकुर्डीजवळ १२० बिघे जमीन इनाम दिली. त्याचा तळ पुरंदरला ठेवला व त्याच्या हाताखाली ४० माणसे त्याचीच ठेवली. त्यांनाही पगार सुरू केले. इंग्रजांच्या नोकरीत राहून मनुष्यबळ वाढवायचे व दरोडेखोरी चालूच ठेवायची. बखळ पैसा साचवायचा-दरोड्यांबद्दल कलेक्टरने विचारले, ‘तर तपास चालू आहे.’ असे मोघम उत्तर देत राहायचे. असा उमाजीचा बेत होता. जुलै १८२८ पासून उलट दरोड्यांचे प्रमाण वाढू लागले. सरकार बुचकाळ्यात पडले.

[irp]

कंपनी सरकारच्या महाराष्ट्रातील राज्याचा हा प्रारंभीचा काळ होता. या प्रारंभीच्या काळातच जनतेत असुरक्षिततेची भावना पसरली, तर राज्याचे स्थैर्य धोक्यात येणार होते. रामोशांचा पुंडावा फारच माजला, तर त्याला जनतेची उघडउघड साथ मिळून राज्य हातातून जाण्याची भीती इंग्रजांना वाटत होती.उमाजीला ठार मारले तर राज्यात मोठे बंड उभे राहण्याचा धोका होता-कारण उमाजीच हा जनतेत आता लोकप्रिय झाला होता.

उमाजी जाणून होता की, सरकारची नोकरी हा तलवारीच्या धारेवरचा खेळ आहे. वर्षभर तो ती नोकरी सांभाळीत होता. पण सरकारला त्याच्या या नोकरीमुळ आपले साध्य साधले जाईल असे आता वाटत नव्हते. म्हणून त्याचा पगार चालू ठेवून सरकारने त्याला पुण्यात नजरकैदेत ठेवले. पण रानच्या वाघाला हे मिळमिळीत जिणे कसे मानवणार दि. १६ डिसेंबर १८३० रोजी उमाजी पुण्यातून पसार झाला व त्याने आपल्या साथीदारांच्या गाठी घेऊन तो कन्हेपठारावर प्रकट झाला. पुन्हा साऱ्या मुलुखात त्याची पुंडाई सुरू झाली. आता सरकारने अॅलेक्झांडर मर्किटाश या शूर व मुत्सद्दी अधिकाऱ्याची नेमणूक ही पुंडाई मोडण्यासाठी केली. पण उमाजी मोठा चतुर. तो कसला त्याच्या हाती लागतो! कारण त्याचे हेरखाते जबरदस्त होते. सरकारच्या इत्थंभूत बातम्या त्याला आधीच समजायच्या. त्याचे व्यवहारिक शहाणपण, मुत्सदेगिरी, माणुसकी एखाद्या मुत्सदी सेना नायकाला साजेशीच होती.

____ कलेक्टर जिब्रान याने २६ जानेवारी १९३१ रोजी उमाजीसह सर्व रामोशांना शरण येण्याचा जाहीरनामा काढला. पण उमाजीने त्याला भीक घातली नाही व आपले उद्योग चालूच ठेवले. नंतर लगेच जिब्रानने दुसरा जाहीरनामा काढला. त्यात नमूद केले की, “उमाजी, भुजाजी, येसाजी कृष्णाजी यांना पकडून देणारांस प्रत्येकी ५००० रूपये व दोनशे बिघे जमीन इनाम दिली जाईल. त्यांची बातमी देणारांस याच्या निम्मे इनाम दिले जाईल.”पण या जाहीरनाम्याचाही काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा मर्किंटाशही थक्क झाला. साऱ्या जनतेवर उमाजीची किती मोहिनी पडली होती, हे त्याला प्रत्यक्ष दिसून आले.

दि. १६ फेब्रुवारी १८३१ रोजी उमाजीने आपला निर्वाणीचा जाहीरनामा काढून तो सर्वत्र प्रसारित केला. तो असा “युरोपियन लोक कोठेही दिसले, तर त्यांना ठार करावे. अशी कामगिरी करणाऱ्यास नव्या सरकारकडून जहागिरी, इनाम व रोख रकम दिली जाईल.

ज्या ज्या लोकांच्या जहागिऱ्या, वतने, तनखे इंग्रज सरकारने जप्त केलेले असतील, ती ती त्यांना नव्या सरकारला पाठिंबा दिल्यास परत दिली जातील.

इंग्रज सरकारच्या घोडदलातील व पायदळातील शिपायांनी ती नोकरी झुगारून देऊन इंग्रज अधिकाऱ्यांना पकडावे व ठार करावे. ही सूचना मानली नाही, तर नव्या सरकारने दिलेली शिक्षा भोगण्यास तयार राहावे.

इंग्रजांच्या मालमत्ता लुटाव्या. त्यांची घरे जाळून टाकावी. इंग्रज सरकारचे सर्व खजिने ही लुटावे. त्याचा हिशेब नवे सरकार मागणार नाही.

कोणत्याही गावाने इंग्रज सरकारला महसूल देऊ नये. दिल्यास त्या गावाची राखरांगोळी केली जाईल. -उमाजी राजे-मुक्काम डोंगर

संपूर्ण हिंदुस्थानातील जनतेसाठी काढलेला हा पहिलाच जाहीरनामा होय. उमाजीचा दृष्टीकोन किती व्यापक होता, हे दिसून येते. हा देश आपला आहे. या देशात आपलेच राज्य हवे, असे तो जनतेला यामधून सांगतो. रावरंकापासून सर्व जनतेमध्ये इंग्रज सरकार विषयी असंतोष असूनही इंग्रज सरकारविरुद्ध उठाव करण्याची हिंमत मात्र कोणातही नव्हती. सर्व राजेरजवाडे व संस्थानिक आपले स्वत्व विसरून स्वार्थात ते विषयोगभोगात लोळत पडले असतांना उमाजीसारखा स्वातंत्र्याची जबरदस्त लालसा असणारा एक रामोशी इंग्रज सरकारविरुद्ध दंड थोपटून उभा राहतो, यातच उमाजीचे थोरपण दिसून येते.

[irp]

___उमाजीचा हा जाहीरनामा वाचताच साऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. मर्कियशच्या हाताखाली असणाऱ्या कॅ. लिव्हिंगस्टोन, कॅ. ल्यूकन. कॅ. बॉईड यासारख्या सेनाधिकाऱ्यांनी जंगजंग पछाडले, तरी उमाजी त्यांच्या हाती लागत नव्हता. म्हणून कलेक्टर जिब्रानने दि. ८ ऑगस्ट १८३१ रोजी आणखी एक नवा जाहीरनामा काढला. तो असा.

“उमाजीस पकडून देणारास १०,००० रुपये रोख व ४०० बिघे जमीन, भुजाजीस पकडून देणारास ५००० रु. रोख व २०० बिघे जमीन व त्यांची बातमी देणारास त्याच्या निम्मे इनाम देण्यात येईल.”

पण एवढ्या मोठ्या बक्षीसाच्या लोभानेही कोणी सुद्धा उमाजी व भुजाजी यांना पकडून देणारा पुढे आला नाही. म्हणून मर्किंटाश सह सारेच इंग्रज अधिकारी चिंताग्रस्त झाले. शेवटी या कामासाठी फितुरीचाच उपयोग करण्याचे त्यांनी ठरविले. उमाजीचे एके काळचे सहकारी बापूसिंग परदेशी, नाना रामोशी व काळू रामोशी यांना हाताशी धरले. त्यांना मोठमोठी इनामे देण्याची लालूच दाखविली. त तेही त्या लालचीने या कामासाठी तयार झाले. त्यांनी उमाजीचा तपास काढून भोर जवळील उत्रोळीला उमाजीस पकडून दोरखंडाने जेरबंद करून पुण्यास आणले. भुजाजी केव्हांच फरार झाला होता. तो दिवस होता १५ डिसेंबर १८३१ चा भुजाजी धावपळीत भयंकर जखमी झाला व त्यामुळे तो मरण पावला. सुमारे दीड महिना उमाजी कैदेत होता. त्याच्यावर खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली व तीनुसार त्याला ३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुण्याच्या शुक्रवार पेठेतील एका झाडावर फाशी देण्यात आले. सन १८१८ ते १८३१ पर्यंत तब्बल तेरा वर्षे इंग्रजांचे तोंडचे पाणी पळविणारा हा महान क्रांतिकारक अखेर दगाबाजीनेच पकडला गेला. त्या काळचे सुशिक्षित व पेशवाईचे गोडवे गाणारे मात्र इंग्रज सरकारची नोकरी मिळविण्यास लालचावले होते, हे विशेष होय.

नंतर उमाजीचा पहिला चरित्रकार व उमाजीस पकडण्याच्या मोहितेचा प्रमुख अॅलेक्झांडर मर्किंडाश म्हणतो

“उमाजीच्या नजरेसमोर शिवाजीचे उदाहरण होते. स्वराज्यसंस्थापक शिवाजी हे त्याचे श्रद्धेचे व स्फूर्तीचे स्थान होते. शिवाजीच त्याचा आदर्श होता. मोठमोठ्या लोकांनी मला स्वतः सांगितले की, उमाजी हा काही असला तसला भटक्या दरोडेखोर नाही. त्याच्या नजरेसमोर नेहमी शिवाजीचे उदाहरण होते. शिवाजीप्रमाणे आपण मोठे राज्य कमवावे, अशी त्याची उमेद होती.”

पुण्याच्या तहसीलदार कचेरीत ज्या ठिकाणी उमाजीला फाशी देण्यात आले. त्या ठिकाणी आता पुतळा स्वातंत्र्याचा संदेश देत ठामपणे उभा आहे. आम्हांला मात्र त्याने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रज सरकारशी दिलेल्या दीर्घकालीन लढ्याची जाणीव नाही, हे आपल्या देशाचे दुर्देव होय.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!