Home Study Material उदमीराम

उदमीराम

१० मे १८५७ रोजी प्रथम भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे रणशिंग उत्तरप्रदेशातील मेरठ येथे कुंकले गेले. मेरठ छावणीतील देशी सैनिक दिल्ली येथे ११ मे रोजी पोचले. त्यांनी बादशहा बहादुर शाह जफर याला तख्तनशीन केले. दिल्लीच्या छावणीतील देशी सैन्य ही त्यांना येऊन मिळाले. या सैनिकांनी ‘मारो फिरंगी को’ अशा घोषणा करीत शेकडो इंग्रजांना यमसदनी पाठवून दिले. अनेक इंग्रज तोंडाला व अंगाला काळ्या रंगाने रंगवून हरियानामधील सोनीपतकडे पळाले. ग्रँड ट्रंक रोडवरून ते आपला जीव वाचविण्यासाठी सोनीपतकडे जात होते. या रोडवरच लिबासपूर नावाचे गाव आहे. त्या गावात वीर उदमीराम हा प्रसिद्ध नेता होता. त्याला समजले की, अनेक इंग्रज आपल्या गावाकडून सोनीपत येथे चालले आहेत. तेव्हा त्याने लगेच आपले २२ शूर साथीदार जमवून त्या रोडच्या जवळ ठाण मांडले. त्यांच्यापैकी काहींच्या हातात तलवारी लखलखत होत्या, तर काहींच्या हातात भरलेल्या बंदुका होत्या.

रोडवरून येणाऱ्या प्रत्येक इंग्रजाला ठार करण्याचे सत्र त्यांनी सुरु केले. आपली इंग्रज सरकारविषयी असलेली चीड शांत करण्याचा प्रयत्न अशा प्रकारे ते करु लागले. एक इंग्रज आप्ला पत्नीसह एका उंटगाडीवरुन लिबासपूरजवळ आला. तेव्हा ती गाडी त्या टोळीने अडविली. त्या इंग्रजाला गाडीवरुन खाली खेचले व त्याचे तुकडे करुन टाकले. त्याच्या पत्नी मात्र त्यांनी हात लावला नाही. तिला मातेसमाने मानून उदमीरामने त्याच दिवशी सायंकाळी एका ब्राह्मण स्त्रीकडे तिची देखभाल करण्यासाठी सोपविले. तिच्या अन्न-वस्त्रांची सोय लावून दिली.

[irp]

आसपासच्या गावांत ही घटना वाऱ्यासारखी पसरली. त्या गावांतून अनेक लोक त्या इंग्रज स्त्रीला बघण्यासाठी आले व आपले कुतुहल शांत करुन गेले. त्यांपैकी राठधना गावचा निवासी सीताराम मात्र लिबासपूरलाच थांबला. तो अत्यंत स्वार्थी व धनलोभी होता. त्याने त्या इंग्रज स्त्रीची भेट घेतली. त्याने त्या इंग्रज स्त्रीला सांभाळणाऱ्या ब्राह्मण स्त्रीशीही विचार विनिमय केला. नंतर त्या इंग्रज स्त्रीला त्याने सांगितले की, “उदमीराम व त्याच्या साथीदारांनी अनेक इंग्रजांना मारुन टाकले आहे. ते तुलाही मारुन टाकतील.” तेव्हा ती इंग्रज स्त्री घाबरली व तिने सीलारामला विनंती केली की, “तुम्ही मला रातोरात सुरक्षितपणे पानीपतच्या छावणीत पोचवून द्याल, तर तुम्हां दोघांना मी भरपूर पैसा देईन.” ती ब्राह्मण स्त्री सुद्धा सीतारामला सामील झाली. सीतारामने घोडा गाडीची व्यवस्था केली व रातोरात त्या इंग्रज स्त्रीला पानीपतच्या छावणीत पोचवून दिले.त्यांच्याबरोबर ती ब्राह्मण स्त्रीही होतीच. त्या दोघांचे त्या इंग्रज स्त्रीने आभार मानले व त्यांना भरपूर पैसा दिला. त्या स्त्रीने आपली हकीकत पानीपत छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितली. लिबासपूरच्या उदमीरामने व त्याच्या साथीदारांनी सोनीपतकडे येणाऱ्या आपल्या इंग्रज बांधवांना कसे मारले, हे सुद्धा तिने सांगितले. ते ऐकून पानीपतच्या छावणीतील इंग्रज अधिकारी संतापले व त्यांनी काही इंग्रज सैनिकांसह लिबासपूरकडे धाव घेतली.

दिल्ली इंग्रजांच्या ताब्यात आली होती. इंग्रज अधिकारी सूडाने पेटले होते. त्यांचे क्रूर दमन, अन्याय, अत्याचार भयंकर रीतीने देशभर सुरु होते. हजारो लोकांच्या कत्तली त्यांनी सुरु केल्या होत्या. पानीपतहून सैन्यासह आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी लिबासपूरला घेरले. त्यांनी सीतारामला व त्या ब्राह्मण स्त्रीला बोलावून घेतले. ती पहाटेची चार वाजेची वेळ होती. इंग्रज अधिकाऱ्यांनी उदमीरामच्या साथीदारांची नावे इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या दोघांना विचारली. उदमीराम व त्याचे साथीदार आपापली शस्त्रे घेऊन त्या इंग्रजांशी लढायला एकत्र आले. त्यांनी इंग्रज सैन्याशी लढाई सुरु केली. पण शेकडो शस्त्रसज्ज इंग्रज सैनिकांपुढे त्यांना हार खावी लागली. त्यांच्यातले बहुतेक मारले गेले. बाकीच्यांना इंग्रजांनी कैद केले. कैद केलेल्यांना रस्त्यावर आडवे पाडून त्यांच्या शरीरावरुन भला मोठा दगडी रोडरोलर फिरवून त्यांच्या शरीराची चिपाडे बनवून टाकली. त्यांच्या रक्ताने तो ग्रँडट्करोड लालेलाल झाला. रक्त रस्त्यावरुन वाहू लागले.
लिबासपूरमधले प्रत्येक घर त्यांनी लुटले लिबासपूरमधून धन-धान्य, दागदागिने, मूल्यपान तीसपस्तीस बैलगाड्यांमध्ये भरुन दिल्लीला पाठवून दिले. सारे गाव उजाड झाले.

[irp]

उदमीराम याला पकडून त्यांनी एका पिंपळाच्या झाडाला बांधले. त्याचे दोन्ही हात पिंपळाच्या खोडाला लोखंडी खिळे मारुन ठोकून टाकले. त्या खोडावरुन दोन्ही हातांचे रक्त वाहू लागले. त्याचा अनन्वितपणे छळ केला. तब्बल पस्तीस दिवस त्याला अन्नपाणी मिळू दिले नाही. अखेर त्याचे प्राणपखेरु उडून गेले. त्याचे शव त्याच्या कुटुंबाला दिले नाही. ते कोठेतरी जंगलात फेकून दिले. त्याचे पुतणे गुलाबसिंह, रामजससिंह सहजराम, जसराम, रतिया यांनाही गोळ्या घालून ठार केले. या भारतमातेच्या सुपुत्रांनी त्या स्वातंत्र्याच्या यज्ञात आपल्या प्राणांची आहुती देऊन अमरत्व प्राप्त केले. लिबासपूरमधले लोक हे क्रूर हत्याकांड कित्येक वर्षे विसरु शकले नाहीत.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!