Home Study Material ईश्वरी पांडे

ईश्वरी पांडे

मार्च १८५७ मध्ये ३४ वी रेजिमेंट मधील शिपाई मंगल पांडे याला कलकत्त्याजवळील डमडम येथील बंदुकीच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका मेहेतराकडून समजले की, इंग्रजांच्या सगळ्या पलटणीतील शिपायांना यापुढे ती काडतुसे दिली जाणार आहेत, त्या काडतुसांच्या वरील वेष्टणाला गायींची व डुकरांची चरबी लावलेली असून ती वेष्टने प्रत्येक शिपायाला दातांनी तोडानी लागणार आहेत. मंगल पांडे हा ब्राम्हण शिपाई होता. चरबी लावलेली काडतुसे दातांनी तोडली तर आपला व मुसलमानांचा धर्म बुडणार. गाय ही हिंदूंना पवित्र, तर डुक्कर हे मुसलमानांना निषिद्ध, आपला धर्म बुडणार म्हणून तो इंग्रज सरकार विरुद्ध बंड करायला उठला. त्याने ही बातमी आपल्या छावणीत पसरविली आणि सर्व शिपायांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारावे असा प्रचार त्याने केला.
२९ मार्च रोजी आपली बंदूक व तलवार घेऊन तो परेड ग्राऊंडवर येऊन सर्व शिपायांना मोठ्याने सांगू लागला की, ‘बंधूनो! इंग्रज सरकार आपला धर्म बुडवायला उठले आहे. म्हणून सर्वांनी इंग्रज सरकारविरूद्ध लढायला तयार व्हावे. मी तर प्रतिज्ञाच केली आहे की, जो कोणी इंग्रज माझ्यासमोर येईल, त्याला मी ठार करीन’ त्याचा आवाज ऐकून अनेक देशी शिपाई ग्राऊंडवर आले व तो काय करतो, हे पाहात त्याच्यापासून काही अंतरावर उभे राहिले. त्यांच्या मध्ये मंगल पांडेचा मित्र जमादार ईश्वरी पांडे हा सुद्धा होता. ही बातमी इंग्रज अधिकाऱ्यांना समजताच त्या पलटणीचा सार्जंट जे. टी. ह्यूसन व लेफ्टनंट व्ही. एच. वाग आपल्या घोड्यांवर बसून ग्राऊंडवर धावत आले. त्यानां पाहताच मंगल पांडेने ह्यसनवर आपल्या बंदुकीने गोळी झाडली. तो जखमी होऊन खाली पडला. नंतर वागवरही त्याने गोळी झाडली, ती त्याच्या घोड्याला लागली व तो घोड्यासह खाली कोसळला. नंतर उठून तलवार उपसून मंगल पांडेकडे धावला. मंगल पांडेने त्याला आपल्या तलवारीने घायाळ केले. तेवढ्यात त्या रेजिमेंटचा कमांडर कर्नल एस्. जी. व्हीलर आपला असिसंट कॅप्टन टूरीसह त्या ठिकाणी आला व त्याने ईश्वरी पांडे या जमादाराला हुकूम सोडला की, ‘तू लगेच मंगल पांडेला पकडण्यासाठी तुझ्या शिपायांना सांग.’ तेव्हा ईश्वरी पांडे म्हणाला, ‘कोणता ही शिपाई हे काम करणार नाही’ ‘का म्हणून?’ व्हीलरने विचारले तेव्हा ईश्वरी पांडे म्हणाला की, शिपाई म्हणतात, ‘आम्ही ब्राम्हणाला पकडणार नाही’ हे ऐकल्यावर त्याने शिपायांना मंगल पांडेला पकडण्यास सांगितले. शिपाई १०/१२ पावले पुढे गेल्यावर ईश्वरी पांडे त्यांना म्हणाला, ‘ठहरो.’ शिपाई तेथेच थांबले.
तेवढ्यात जनरल हिअरसे काही इंग्रज शिपायांसह ग्राऊंडवर आला. तेव्हा शेख पलटू या शिपायाने मागच्या बाजूने जाऊन मंगल पांडेला घट्ट धरुन ठेवले. इंग्रज सैनिकांच्या हातून मरण येण्यापेक्षा आपणच स्वतः मेलेले चांगले. या विचाराने मंगल पांडेने स्वत:वर गोळी झाडून घेतली. व तो जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला. तेव्हा त्याला दवाखाण्यात पोचविण्यात आले. उपचारांनंतर तो बरा झाला. त्याच्यावर सैनिकी कोर्टात दावा दाखल केला. त्यात त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली व ८ एप्रिल १८५७ रोजी त्याला फासावर चढविण्यात आले. त्याच्या बलिदानाने देशातील साऱ्या देशी पलटणी उत्तेजित झाल्या.

[irp]

ईश्वरी पांडेने मंगल पांडेचे समर्थन केले, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हुकुमाची अवहेलना केली, कमांडर व्हीलरचा हुकूम मानला नाही. असे आरोप ईश्वरी पांडेवर ठेवून त्याच्या वरही सैनिकी कोर्टात दावा दाखल करण्यात आला. त्या साठी जरब दाखवून १६ साक्षीदार इंग्रज अधिकाऱ्यांनी तयार केले. सैनिकी न्यायालयाचा अध्यक्ष जाणून बुजून ४३ वी रेजिमेंटचा एक ब्राम्हण मेजर जवाहरलाल तिवारी याची नेमणूक केली. न्यायालयात ईश्वरी पांडेने आपल्या बचावाचे निवेदन केले. ‘मी कोणताच अपराध केलेला नाही. मी निर्दोष आहे.’ असे त्याने सांगितले. परंतु साक्षीदारांच्या साक्षी विचारात घेऊन ईश्वरी पांडेला मृत्युदंड देण्यात आला. २२ एप्रिल १८५७ रोजी ईश्वरी पांडेला फाशी देण्यात आले.

[irp]

ईश्वरी पांडे हा उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यातला रहिवाशी होता. तो ताकदवान आणि बहादुर जवान होता. मंगल पांडे त्याचा जिवलग मित्र होता. आपल्या धर्मरक्षणासाठी या देशभक्त स्वातंत्र्यवीराने आपल्या प्राणांची पर्वा न करता मंगल पांडेचे समर्थन केले आणि स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर प्राणार्पण केले.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!