आसरा

177

पुस्तकाचा सारांश

समाजकल्याण खात्यांत सुमारे २१ वर्षे काम केल्यावर पुस्तक लिहिण्याचा मी हा प्रयत्न केला आहे. लहानपणापासून गरिबाबद्दल दया व दुःखी माणसास मदत करण्याची बुद्धी मला देणाऱ्या परमेश्वरास व माझ्या मातापितरास विनम्रपणे नमन केल्या नंतरच मी माझे मनोगत उघडे करीत आहे.

___ मराठी भाषेची सेवा करण्याची इच्छा मराठी हा विषय घेऊन पदवीधर झाल्यापासून माझ्या मनांत आहे. त्यातच समाजसेवेचे कार्य करीत असताना जे ज्ञान पुस्तकातून व अनुभवाने मिळाले तेच बीज रूपाने मनात रुजले व त्याला ही छोटीशी पालवी फुटली आहे. या खात्यात काम करीत असताना आठ नऊ वर्षे भिकाऱ्याच्या प्रश्नाविषयी फार जवळून माहिती मिळाली एवढेच नव्हे तर कितीतरी भिकारी हे माझे मित्र झाले. त्यांनी आपले हृदय माझ्याजवळ उघडे करून दाखविले. आपल्या समाजाच्या या खिडकीतून मला आत डोकावता आले व यातूनच मला समाजाचे फार जवळून दर्शन झाले आहे. स्वतः भिकाऱ्यांच्या बरोबर कार्य करताना मला जे काही समजले ते इतरांच्या माहितीकरिता लिहून ठेवले आहे. समाजशास्त्राचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, या क्षेत्रांत काम करणारे अधिकारी व इतर यांनाही या पुस्तकांत बरीच नवीन व उपयुक्त अशी माहिती मिळेल असे मला वाटते.

समाजकल्याण खात्यात काम करीत असताना श्री. शरदचंद्र गोखले यांच्याबरोबर काम करण्याची संधी प्राप्त झाली व त्याचवेळी या विषयावर लिहिण्याची प्रेरणाही त्यांच्यामुळेच मिळाली. हे पुस्तक लिहित असताना सुद्धा त्यांनी खूप उपयुक्त अशा सूचना केल्या. या त्यांच्या प्रेमाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

या पुस्तकास पुरस्कार लिहून देण्याची विनंती करताच श्री. वसंतराव नाईक, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी अनुमोदन दिले व फारच उपयुक्त असा पुरस्कार त्वरित लिहून दिल्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.

त्याचप्रमाणे समाज कल्याण खात्याचे मंत्री श्री. बाबुराव भारस्कर यांनी तर विनंती करताच पुस्तकास सुयोग्य व शास्त्रोक्त अशी प्रस्तावना लिहून दिली. याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.

समाजकल्याण खात्याचे भूतपूर्व संचालक श्री. श्रीधरपंत हाटे I.A.S.यांनी मौलिक सूचना केल्या. या त्यांच्या प्रेमळ मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचाही ऋणी आहे. समाजकल्याण खात्याचे सध्याचे संचालक श्री. डी. जी. जाधव।.A.S. यांनीही जे प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्यांचाही मी ऋणी आहे.

समाजकल्याण खात्यात काम करणारे भूतपूर्व मुख्य निरक्षक डॉ. डी. व्ही. कुलकर्णी व श्री. जी. एन हर्षे तसेच सध्याचे मुख्य निरिक्षक श्री. बेलवडी व श्री. खरे तसेच विभागीय अधिकारी सर्वश्री वाईकर व गायकवाड या सर्व अधिकाऱ्यांनी हे पुस्तक लिहित असताना महत्वपूर्ण सूचना केल्या त्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत आभारी आहे.

या पुस्तकाच्या टंकलिखित प्रती काढण्याच्या कामी कुमारी पार्वती कांबळे यांनी मोठे सहाय्य दिले. तसेच पुस्तकाला “आसरा” हे अतिशय सुयोग्य असे नाव सुचवल्याबद्दल माझ्या पत्नी सौ. आशा उजगरे यांचे आभार मानणे जरूर आहे.

तसेच या खात्यात काम करणाऱ्या व इतरही पुष्कळ मित्रांनी या कार्यांत प्रोत्साहन दिले याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो.

पुस्तकाच्या “आसरा” या नावातून भिकाऱ्याला आश्रयाची अधिक जरूर आहे ही कल्पना ध्वनित होते. भिकाऱ्यामध्ये वृद्ध, अपंग मनोविकृत व शारीरिक व्याधींनी ग्रस्त अशांचे मोठे प्रमाण आहे. माणूस म्हणूनया साऱ्यांना समाजाने आसरा देणे जरूर आहे. मनोविकृतांना व आजाऱ्यांना औषधोपचारासाठी योग्य ठिकाणी आसरा हवा असतो. त्यांना तो मिळविता यावा याची समाजाने सोय करून ठेवली पाहिजे. तसेच भीक मागण्यात गैर असे काही नाही. किंवा भीक मागणे हा आमचा अधिकार आहे असे ज्यांना वाटते त्यांना काही वेळेस आश्रय देऊन किंवा समाजात ठेऊन सुद्धा शिक्षणाचे वा इतर संस्कार करून त्यांच्या मनामधील हा दोष काढून टाकण्याचा समाजाने प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे दान देणाऱ्यांनी आपल्या दानाचा ओघ व्यक्ती ऐवजी संस्थेकडे वळवावा या विचारांना या पुस्तकात चालना दिलीआहे.

महाराष्ट्र राज्यात भिकाऱ्यांसाठी काय केले जाते ही माहिती तर या पुस्तकात दिली आहेच पण त्याच्या जोडीस समाजाची याबाबतीत काय जबाबदारी आहे याचीही कल्पना देण्याचा प्रयत्न केला आहे. याच कारणामुळे हे पुस्तक समाजकल्याण खात्यांत काम करणाऱ्यांनाच नव्हे तर आम जनतेस उपयोगी पडेल अशी आशा आहे.

हे पुस्तक छापण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाने घेतल्यामुळेच हे पुस्तक छापून तयार झाले आहे. याबद्दल मी मंडळाचा अत्यंत आभारी आहे. तसेच पुस्तकाचे हस्तलिखित तपासण्याचे (अवघड) काम एका विद्वान मित्राने केले. त्यांचेही मी आभार मानतो.

रचना प्रिंटर्सचे मालक श्री. राघोबा म्हात्रे यांनी छपाईचे काम फार वेगाने व सुबकतेने केले याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे.

या पुस्तकाच्या अखेर परिशिष्टामध्ये दिलेली आकडेवारी व माहिती ही जुनी आहे त्यामध्ये मला सध्यापर्यंतची आकडेवारी घालता आली नाही. तसेच नवीन बदल झालेली माहितीही उपलब्ध करून देता आली नाही. याबद्दल वाचक मला क्षमा करतील अशी आशा आहे. कारण मूळ प्रश्नात त्यामुळे फरक होत नाही.

समाजाचे प्रयत्न व परमेश्वराच्या सहाय्याने भारतातील भिकाऱ्यांचे निर्मूलन व्हावे हीच भाग्य नियंत्यापाशी प्रार्थना आहे.

-वि. भा. उजगरे

Preview

Download E-Book
Download Now

This file is not uploaded on Bhartijahirat.com we are only providing download link

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाबद्दल थोडक्यात

स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राच्या ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक गरजा आधीच हेरुन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री. यशवंतरावजी चव्हाण यांनी दिनांक १ मे १९६० रोजी, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी शासनाची जी धोरणविषयक प्रमेये जाहीर केली त्यात मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्याची प्रगती होईल असे आश्वासन दिले होते. त्याच धोरणानुसार महाराष्ट्राचे साहित्य, इतिहास व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक १९ नोव्हेंबर १९६० रोजी शासनाने “साहित्य संस्कृती मंडळाची” स्थापना पहिल्यांदा पाच वर्षाकरिता केली.

“महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने” प्रकाशित केलेली ४०० हून अधिक पुस्तके वाचकांसाठी PDF, Mobi, EPub या पोर्टेबल फॉरमॅटस् मधे विनामूल्य उपलब्ध केली आहेत. या बरोबरच सदर ४००हून अधिक पुस्तके ‘जशीच्या तशी’ स्कॅन करून वाचकांसाठी PDF या पोर्टेबल फॉरमॅटस् मधे विनामूल्य उपलब्ध केली आहेत. डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

दिनांक 19 नोव्हेंबर 1960 च्या ज्या शासकीय ठरावान्वये मंडळाची प्रथम स्थापना झाली त्या ठरावानुसारच शासनाने मंडळाकडे खालील उद्दिष्टे व जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत –

  • महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती व इतिहास या क्षेत्रातील संशोधनांचे प्रकल्प वा योजना यांच्या पूर्ततेसाठी चालना देणे, मदत करणे वा अशा योजना मंडळाने स्वतः हाती घेणे.
  • अशा संशोधनांचे मराठीतून प्रकाशन करण्यासाठी चालना देणे, मदत करणे वा मंडळाने स्वतः प्रकाशित करणे.
  • स्वतंत्र व विद्यमान्य प्रबंध, व्याप्तिलेख, ग्रंथ, नियतकालिके त्याच प्रमाणे ज्ञानविज्ञानाच्या कोणत्याही शाखेतील कोणत्याही अन्य लेखनाचे मराठीतून प्रकाशन करण्यासाठी चालना देणे, मदत करणे वा मंडळाने ते स्वतः प्रसिद्ध करणे.
  • साहित्य अकादमीने आधीच भाषांतरासाठी हाती घेतलेले ग्रंथ वगळून मराठीखेरीज अन्य भारतीय भाषा व परदेशी भाषा यातील अन्य उत्कृष्ट ग्रंथांची मराठीत भाषांतरे करुन घेणे व ती प्रसिद्ध करणे. तसेच, अशा भाषांतराच्या योजनांस चालना देणे व मदत करणे.
  • महाराष्ट्राचा इतिहास व संस्कृती यांची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आधारभूत अशी महत्त्वाची प्रकाशित वा अप्रकाशित साधनसामग्री (कागदपत्रे) संपादित करणे, मराठीत भाषांतरित करणे व प्रसिद्ध करणे आणि अशा योजनांना चालना देणे, मदत करणे वा त्या योजना स्वतः कार्यान्वित करणे.
  • महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व वाङ्‌मयीन इतिहासाचे संपादन व प्रकाशन करण्याबाबतच्या योजनास चालना देणे, मदत करणे वा अशा योजना स्वतः कार्यान्वित करणे.
  • साहित्यविषयक संशोधन व साहित्याची अभिवृद्धी याबाबत शासकीय धोरण आखण्यासाठी शासनास मदत करणे.

Other Books

Posts not found

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here