Home Study Material आत्माराम चौकेकर

आत्माराम चौकेकर

इंग्रजांनी मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे वखारी स्थापन करून व्यापार सुरू केला. येथल्या राजांचे आपआपसातील वैमनस्य व त्यांच्यात चालू असलेल्या लढाया, त्यातल्या त्या या राजांचा कमकुवतपणा ओळखून या परकी व्यापारी फिरंग्यांनी संधी सापडेल तेव्हा अशा राजांच्या कारभारात आपली उंटाची मान घातली व हळूहळू भारतातला बराच प्रदेश आपल्या कबजात आणला. त्यांची हाव इतकी जबरदस्त की, या देशातला कोपरान् कोपरा आपल्या ताब्यात आलाच पाहिजे. कारण या देशात असणारी मुबलक साधन संपत्ती.
मोगलांच्या नादान उत्तराधिकाऱ्यांच्या अदूरदर्शीपणामुळे, दरबारातील हेव्यादाव्यांमुळे त्यांना आपल्या कह्यात आणणे इंग्रजांना सोपे गेले. त्यानंतर पेशवाईच्या उत्तरकाळात राघोबा व त्याचा नादान पुत्र बाजीराव यांच्या परधार्जिणपणामुळे, तसेच हावरटपणामुळे पेशवाईही रसातळास चालली होती. ती संधी इंग्रजांनी साधून महाराष्ट्रही गिळंकृत करण्यास सुरूवात केली. व १८१८ साली ती बुडवून आपले राज्य या प्रदेशात सुरू केले. त्यांनी कोकणातही प्रवेश केला व १८१३ साली. मालवण येथे आपली वकिलात सुरू केली. आणि तेथून सलग सहा वर्षे सावंतवाडीच्या संस्थानिकाला आपल्या नीच कारवायांनी बेजार केले. शेवटी हतबल होऊन सावंतवाडीकरांनी इंग्रजांचे मांडलिकत्व १७ फेब्रुवारी १८१९ रोजी त्यांच्याशी एक तह करून पत्करले. इंग्रजांचा पोलिटिकल एजंट सावंतवाडी दरबारात हक्काने लक्ष घालू लागला. जेव्हां इंग्रज सैन्याची एक तुकडी शिस्तबद्ध पावले टाकीत सावंतवाडीत शिरली, तेव्हाच तेथल्या लोकांना कळून चुकले की, आपले स्वातंत्र्य आता हरपले आहे.

सन १८२३ मध्ये खेमसावंत ऊर्फ बापूसाहेब सावंतवाडीच्या गादीवर बसला. त्याच्या कारकीर्दीत तीन वेळा चांगलीच बंडाळी माजली. तेव्हा प्रत्येक वेळी त्याने आपल्या दरबारातील पोलिटिकल एजंटाकडे सैनिक साह्य मागून ती बंडाळी शमविली. इंग्रजांनाही तेच हवे होते. त्यांनी त्याचा फायदा उठविला सन १८२८ मध्ये महादेवगडचा त्याआधीचा किल्लेदार फोंडसावंत याने तो गड ताब्यात घेऊन खेम सावंता विरूद्ध बंड सुरू केले. तेव्हा राजाने इंग्रजांकडे मदत मागितली. मुंबईच्या गव्हर्नरने एक पलटण पाठविली तेव्हा फोंडसावंत आणि त्याचे सहकारी इचलकरंजी संस्थानात १८३० मध्ये पळून गेले.
राजा खेमसावंतांची पत्नी दादीबाई हिला राजाचे धोरण पसंत न पडल्याने तिनेच राजाविरुद्ध बंड पुकारले. काही लोकांना हाताशी धरून १९३२ साली राजाच्या सैन्यावर हल्ला केला. इंग्रज सैन्याचा मदतीने खेमसावंतांची आपल्या पत्नीचा तो पुंडावा मोडून काढला. आतापर्यंत दोन वेळा खेमसावंताला इंग्रज सैन्याचे साह्य घ्यावे लागले. इंग्रज पोलिटिकल एजंटाने खेमसावंताशी करारनामा केला. सावंतवाडीच्या दरबारातील दीवाण विठ्ठल सबनीस हा इंग्रजांना सामील होता. त्याची नेमणूक खेमसावंताच्या मर्जीविरुद्ध इंग्रज एजंटाने करायला लावली होती. त्या करारनाम्यात असे नमुद करण्यात आले होते की, विठ्ठल सबनीसाला दीवाणपदावरून कधीही काढले जाऊ नये. तो कायम त्या पदावर राहावा. राजाला हे मान्य नसले तरी असहायतेने ते मान्य करावे लागले. हा दीवाण गावागावातला वसूल चिठ्ठ्या न देता गोळा करू लागला. त्या एजंटाने संस्थानचे जकातीचे उत्पन्नही आपल्या इंग्रज फौजेच्या खर्चासाठी १८३८ साली आपल्याकडे घेतले. अखेरीस खेमसावंत हा राज्य करण्यास लायक नाही, त्याला आपल्या राज्यात शांतता राखता येत नाही. ही कारणे दाखवून त्या एजंटाने राजाला पदच्युत केले व सावंतवाडी सरकारचा कारभार स्वतःकडे घेतला यामुळे सावंतवाडी संस्थानातील जनतेत इंग्रजांविषयी भयंकर तिरस्कार उत्पन्न झाला. जनतेत सर्वत्र सूडाची भावना निर्माण झाली.

[irp]

सावंतवाडी दरबारातील सरदार इंग्रजांचा बदला घेण्यास एकत्र आले. त्यांचा पुढारी आत्माराम चौकेकर हा होता. त्याने जनतेतून चांगले १०० लढवय्ये मिळविले व आपल्या साथीदार सरदारांसह हे सैन्य घेऊन सावंतवाडीच्या किल्ल्यावर अचानक हल्ला करून तो ताब्यात घेतला. एका कोठडीत दीवाण विठ्ठल सबनीस यास कोंडून ठेवले. आत्माराम चौकरला व त्याचे साथीदार खेमसावंतास भेटले ते पोलिटिकल एजंट स्पूनर यास समजताच त्याने आपल्या इंग्रज सैन्यासह मुशीचा दरवाजा ताब्यात घेतला. ते पाहताच आत्माराम चौकेकर आपल्या साथीदार सरदारांसह व त्या थोड्याश्या सैन्यासह आर्काच्या दिंडीमधून पळून जाऊ लागले. स्पूनरने त्या सरदारांपैकी रामसावंत तिखडेकर व काही सैनिकांना ताब्यात घेतले. बाकीचे तटावरून उड्या टाकून पळून गेले. रामसावंताला व त्याच्या १४ सैनिकांना जन्मठेपेच्या शिक्षा देऊन त्यांना अहमदाबादच्या तुरूंगात पाठवून दिले.

[irp]

पोलिटिकल एजंटाच्या या कृत्याने आत्माराम चौकेकर व त्याचे साथीदार सरदार भयंकर चवताळले. चौकेकराने भोज सावंत माणगावकर यास आपल्या मदतीस घेतले व गोव्याच्या हद्दीतूनही काही योद्धे मिळविले. सावंतवाडीतून काही लोक आपल्याकडे वळवून घेतले. आणि १९ डिसेंबर १८३८ रोजी हणमंतगडावर हल्ला करून तो गड ताब्यात घेतला. सावंतवाडीचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या सभोवतालच्या मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. इंग्रज एजंट स्पूनरने आपले सैन्य या बंडखोरांचा पाडाव करण्यासाठी पाठविले. चांगलीच झोंबाझोंबी झाली. तीत आत्माराम चौकेकर व त्याचे साथीदार सरदार इंग्रज सैन्याच्या हाती लागले. भोजसावंत गोळीबारात ठार झाला. आत्माराम चौकेकर व त्याच्या साथीदार सरदारांना जन्मठेपेच्या व अन्य सैनिकांना लहान मोठ्या कैदेच्या शिक्षा देऊन त्यांना तुरूंगात डांबले. सावंतवाडीकरांचा हा पहिला स्वातंत्र्याचा प्रयत्न अशा रीतीने असफल झाला. तरी त्यांचा पुढारी आत्माराम चौकेकर याचे नावे सावंतवाडीत अमर झाले.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!