Home Study Material अमरचंद बाठिया

अमरचंद बाठिया

सन १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाची तयारी करण्यासाठी आपल्या देशातील त्या काळच्या साधूंनी, फकिरांनी गुप्तचराचे कार्य करून उठावाची आग आपल्या धार्मिक प्रवचनातून, उपदेशांतून भारतभर गुप्त रीतीने फैलावली. साधू व फकीर सतत या गावाहून त्या गावाला हिंडत राहतात. त्यांच्या मुक्त संचाराला कोणीही अटकाव करू शकत नाही. ते गुप्तपणे क्रांतीचे वारे देशभर पसरवीत आहेत, हे परक्या इंग्रज सरकारला कसे कळणार? नानासाहेब पेशवे आणि त्यांच्या सहकऱ्यांनी या साधूंना व फकिरांना या कामी लावले होते. कारण हे साधू व फकीर आपल्या प्रवासात इंग्रजांचे जनतेवरील अत्याचार पाहातच होते. त्यामुळे त्यांनाही वाटे की या लालतोंड्यांचे राज्य आपल्या देशातून नाहीसे झाले पाहिजे. क्रांतिकारकांचे अनेक हिंदू व मुसलमान गुप्तहेरही साधूंच्या व फकीरांच्या वेषात इंग्रजांविरूद्ध उठावाचा प्रचार आपल्या प्रवचनातून करीत असत. त्यामुळे इंग्रजांच्या अत्याचारांनी त्रस्त झालेली जनतासुद्धा इंग्रजांविरुद्ध उठाव केव्हा सुरू होतो, याची प्रतीक्षा करीत होती.

___ ग्वाल्हेरच्या शिंद्यांचे खजिनदार अमरचंद बाठिया हे श्वेतांबर जैन पंथाचे धर्मनिष्ठ, प्रामाणिक व मेहनती होते. ते दररोज सकाळी स्नानानंतर मंदिरात जायचे व साधू-महंतांचे प्रवचन ऐकल्यावरच घरी परतायचे. एका संन्याशाने त्यांना सांगितले की, कलकत्त्याजवळच्या ४७ व्या पलटणीने ब्राम्हणदेशच्या युद्धात भाग घेण्यासाठी जाण्यास नकार दिला. ती मधील मुसलमान सैनिकांनी दुप्पट भत्ता मागितला. हिंदूंना तर मनुस्मृतीच्या आज्ञेनुसार समुद्रपार जाणे निषिद्धच होते. तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या ४७ व्या पलटणीवर तोफांचा मारा करून त्यांना ठार केले. वाचलेल्या सैनिकांना फाशी दिले व ती पलटन नष्ट करून टाकली. हे ऐकल्यावर अमरचंद बाठियाच्या मनात इंग्रजांविरूद्ध रोष निर्माण झाला. ते बेचैन होऊन गेले.

राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे व रावसाहेब पेशवे यांनी आपल्या सैन्यासह ग्वाल्हेरवर आक्रमण करून ग्लाल्हेर ताब्यात घेतले. रावसाहेब पेशव्यांना मराठा राज्याचा उत्तराधिकारी म्हणून तेथे त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. तेव्हा खजिनदार अमरचंद बाठियाने ग्वाल्हेरच्या खजिन्यातून भरपूर संपत्ती त्यांच्या स्वाधीन केली. त्यांना धनाबरोबर धान्य व शस्त्रेही दिली. त्या धनातून त्यांनी ५ महिन्यापासून थकलेला पगार तर दिलाच वर प्रत्येक सैनिकाला बक्षीसी सुद्धा दिली. अमरचंद बाठियाने वेळोवेळी त्या खजिन्यातून पैसा काढून रावसाहेबाला दिला.

[irp]

अमरचंद बाठियाने दिलेल्या धनामुळे लक्ष्मीबाई, तात्या टोपे व रावसाहेब पेशव्यांचे बळ वाढले. जेव्हा सर ह्यू रोज व जनरल स्मिथने ग्लाल्हेरवर हल्ला केला, तेव्हा क्रांतिकारी सैन्याने त्यांच्याशी जबरदस्त लढा दिला.पराभवाची लक्षणे दिसू लागताच लक्ष्मीबाई घोड्यावर बसून रणक्षेत्रातून निसटून निघून जाऊ लागली. ते पाहताच काही गोरे घोडेस्वार तिचा पाठलाग करण्यासाठी धावले. एका वाहत्या ओढ्याजवळ राणीचा घोडा अडला. तेव्हा एका गोऱ्या सैनिकाने तिच्यावर वार केला. धोड्यावरून पडता पडता राणीने आपल्या तरवारीने त्याचा शिरच्छेद केला. तो १८ जून १८५८ चा दिवस होता. राणी मरण पावल्यावर तिच्या रामचंद्रपंत नावाच्या सैनिकाने जवळच्या गवताच्या गंजीत तिचा अग्निसंस्कार केला.

ग्वाल्हेर इंग्रजांच्या ताब्यात आले. आग्रा येथे आपला दिवाण दिनकरराव राजवाडे यांच्या सल्ल्याने पळून जाऊन इंग्रजांच्या आश्रयास राहिलेला ग्वाल्हेरचा राजा जयाजीराव शिंदे ग्वाल्हेरला परत आला. क्रांतिकारकांच्या हाती ग्वाल्हेरचा खजिना सोपविला म्हणून ब्रिगेडियर नेपियर या इंग्रज सेनाधिकाऱ्याने खजिनदार अमरचंद बाठियाला कैद केले. २२ जून १८५८ रोजी न्यायाचे नाटक रचून त्या देशभक्त खजिनदाराला लष्कर भागातील सराफा बाजारातील एका निंबाच्या झाडाच्या फांदीवर फासावर चढविले. जनतेत आपला धाक जमविण्यासाठी त्याचे प्रेत त्या झडावरच तीन दिवस लटकत ठेवले.

[irp]

खजिना ग्वाल्हेरच्या शिंद्यांचा. त्यांच्या खजिनदाराने तो क्रांतिकारकांना दिला. त्याच्यावर इंग्रजांचा अधिकार कोणत्या न्यायाने पोचतो? तेव्हा खजिनदार अमरचंद बाठिया यांना त्यांनी गुन्हेगार ठरविण्याचा काय अधिकार? याचे उत्तर स्पष्ट आहे. इंग्रजांनी ग्वाल्हेर ताब्यात घेतल्या समयी जयाजीराव शिंदे आग्रा येथे इंग्रजांच्या आश्रयाला होते. त्यांच्या अनुपस्थितीत ता खजिना इंग्रजांना हस्तगत करायचा होता. पण त्या अधीच तो अमरचंदांनी क्रांतिकारकांना देऊन टाकला होता. इंग्रजांना तो खजिना मिळू न शकल्याने ते संतापले व त्यांनी अमरचंदांना फासावर लटकविले. इंग्रज हे लुटारू आहेत. छलकपट, गुंडगिरी, लूटमार करण्यात ते कसलेही शुभाशुभ मानीत नव्हते. एवढेच नव्हे, तर कसलेही कारण नसता या देशातील लहानमोठ्या राज्यांवर देशी सैन्याच्या साह्याने आक्रमणे करून ती राज्ये लुटून बरबाद केली होती व तेथल्या राजांना आपल्या ताटाखालीची मांजरे बनविली होती. ग्वाल्हेरचे शिंदेही त्यातलेच.

___ ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी तरी कोठे घाम गाळून ती गडगंज संपत्ती जमविली होती? त्यांनीही अनेक राज्यांवर आक्रमणे करून त्या राज्यांचे खजिने हडप केले होते. जनतेचेशोषण करून आपला खजिना भरला होता. त्या खजिन्यातली संपत्ती अर्थात जनतेचीच होती. ती देशाच्या स्वतंत्र्य लढ्यासाठी अमरचंदांनी दिली, हे योग्यच होते, असेच म्हणावे लागेल. आजही त्यांना ज्या निंबाच्या झाडावर फाशी दिले, तो निंब अमरचंदांची स्मृती जागवत तेथे उभा आहे. त्यांचे कानपूरचे वंशज हजारीमल बाठिया यांनी कानपूर येथे अमरचंदांचा भव्य पुतळा उभारून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!